अग्रलेख...
renuka chowdhury ‘एव्हरी डॉग हॅज इट्स डे’ असा एक वाक्प्रचार इंग्रजीत रूढ आहे. याचा शब्दशः अर्थ पाहिला, तर प्रत्येक श्वानाचा चमकण्याचा एक दिवस असतो. म्हणजे प्रत्येकास कधी ना कधी संधी मिळते. महाभारतातील कथेत पांडवांचा ज्येष्ठ बंधू धर्मराजाने स्वर्गारोहणाच्या समयी आपल्या आवडत्या श्वानास सोबत घेतले आणि स्वर्गाच्या दारी पहारेकऱ्यांनी त्यास अडविले. श्वानास स्वर्गात प्रवेश नाही, या नियमांवर बोट ठेवून स्वर्गाच्या राखणदारांनी धर्मराजासही प्रवेश नाकारला, तेव्हा धर्मराजाने श्वानास सोबत घेऊनच स्वर्गप्रवेश करण्याचा आपला हेका सोडला नाही. त्या पुण्यात्म्यास प्रवेश तर द्यावाच लागेल, हे लक्षात येताच त्याच्या श्वानासह त्याचे स्वर्गारोहण झाले, अशी ही कथा आजही सांगितली जाते. त्या दिवशी धर्मराजाच्या त्या आवडत्या श्वानास स्वर्गारोहणाची संधी मिळाली. त्यानंतर श्वानकुळातील अनेकांस प्रतिष्ठेच्या संधी प्राप्त झाल्या. एखादी व्यक्ती जेवढी मोठी तेवढा त्याच्या आवडत्या पाळीव श्वानाचा मानही मोठा, ही तर पुढे रीतच होऊन गेली. कदाचित यामुळेच राहुल गांधी यांच्या भेटीसाठी थेट आसाममधून येऊन ताटकळलेल्या हिमंत बिस्व शर्मा यांच्याकडे दुर्लक्ष करून काँग्रेसचा हा नेता आपल्या लाडक्या ‘पिद्दी’ या पाळीव श्वानास बिस्कीट भरवत बसला आणि अपमानित हिमंत बिस्व शर्मा यांनी काँग्रेसचा त्याग केल्यानंतर आसाममधील काँग्रेसची सत्ता गेली असे म्हणतात.

काँग्रेस पक्षाचे नेते कार्यकर्त्यांहून किंवा पक्षाच्या अन्य नेत्यांहूनही श्वानाची प्रतिष्ठा जपतात, असा आरोप भारतीय जनता पार्टीने केल्याने त्यावर राजकीय गदारोळही माजला होता. अशाच श्वानप्रेमाच्या कहाण्यांची मालिका जेव्हा लोकशाहीचे सर्वोच्च मंदिर मानल्या जाणाऱ्या संसदेच्या दारापर्यंत पोहोचते आणि काँग्रेसच्या नेत्यांचे श्वानप्रेम पुन्हा भरभरून वाहू लागते, तेव्हा काय होते, याचा प्रत्यय संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी देशाला आला. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी, सोमवारी काँग्रेसच्या राज्यसभा सदस्या रेणुका चौधरी यांनी आपल्या गाडीतून कुत्र्याचे एक पिल्लू संसदेच्या आवारात आणले आणि तेथील सुरक्षा यंत्रणेने श्वानप्रवेशास मनाई असल्याच्या नियमावर बोट ठेवून त्या पिलास प्रवेश नाकारला. रेणुका चौधरी मात्र श्वान-प्रवेशाचे जोरदार समर्थन करीत होत्या. एका क्षणी त्या समर्थनाने एवढे शिखर गाठले की, पत्रकारांच्या एका प्रश्नावर प्रतिसाद देताना त्यांनी स्वतःदेखील श्वानाच्या भुंकण्याच्या भाषेत आपल्या भावना व्यक्त केल्या. प्राणिप्रेम किंवा भूतदयेची त्यांची भावना कौतुकास्पदच होती, पण ज्यारीतीने त्यांनी आपल्या प्राणिप्रेमाचे प्रदर्शन केले आणि त्यासाठी संसदेत बसणाऱ्या सर्वांची तुलना श्वानकुळासोबत केली, त्यावर संतप्त प्रतिक्रिया उमटणे साहजिक होते. तशी ती उमटली आणि संसदेच्या सदस्यांना श्वानाची उपमा देऊन रेणुका चौधरी यांनी सर्वोच्च सभागृहाच्या प्रतिष्ठेचा अपमान केला, या जाणिवेने त्यांच्या त्या भुत्काराच्या भाषेतील भावनेच्या निषेधाचे सूरही सर्वत्र उमटू लागले. महाभारतातील त्या कथेत धर्मराजाच्या त्या लाडक्या श्वानास स्वर्गारोहणाची संधी मिळाली. कारण धर्मराजाच्या पुण्याईचा त्या श्वानाला सहजपणे लाभलेल्या स्वर्गारोहणाच्या संधीमागे प्रभाव होता. रेणुका चौधरी यांनी सोबत आणलेल्या त्या निष्पाप श्वानास आपल्यामुळे उठलेल्या गदारोळाची जाणीवही नसावी आणि रेणुका चौधरी यांच्या आक्रस्ताळ्या हट्टामागे धर्मराजासारखी पुण्याईदेखील नसावी. त्यामुळे त्यावर गदारोळ माजला. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस मात्र त्या श्वानावरील चर्चेचा ठरला. रेणुका चौधरी यांच्या उद्धट वक्तव्यामुळे हा वाद पक्षाच्या अंगाशी येण्याची चिन्हे दिसू लागताच अवघ्या काँग्रेस पक्षावर बचावाचा प्रसंग ओढवला. पक्षाचे प्रवक्ते पवन खेरा यांनाही, खोकल्यामुळे आपला सूरदेखील श्वानाच्या भुंकण्यासारखाच भासत असल्याची जाणीव झाली आणि श्वानप्रेमाच्या पुरात अवघा पक्ष डुंबू लागला. असे म्हणतात की, राहुल गांधी यांच्या श्वानप्रेमाची महती काँग्रेसजनांस अगोदरपासूनच ठाऊक असल्यामुळेच श्वानकुळास मान देण्याची चढाओढ पक्षात सुरू झाली, त्यामुळेच काँग्रेसच्या राज्यसभा सदस्य असलेल्या रेणुका चौधरी यांनी रस्त्यावर भरकटलेल्या श्वानास आपल्या गाडीत बसवून थेट संसदेपर्यंत आणण्याचा घाट घातला.renuka chowdhury त्यामुळेच पवन खेरा यांना आपला सूर श्वानाच्या भुंकण्यासारखा भासू लागला. आपला आवाजही कुत्र्याच्या भुंकण्यासारखा भासू शकतो, असे सांगून रेणुका चौधरी यांच्याशी स्पर्धा करणाèया पवन खेरा यांना राज्यसभेची संधी पक्षाकडून मिळू शकेल, अशी कुजबूज आता सुरू झाली आहे. राजकारणात काय खरे आणि काय खोटे हे लगेचच ठरविता येत नाही. ते सिद्ध होण्यासाठी काही काळ जावा लागतो. त्यामुळे रेणुका चौधरी यांच्या श्वान-प्रवेशनाट्याच्या पहिल्या अंकानंतर पक्षात जे काही घडले, त्याची राहुल गांधींनी आपल्या स्वभावानुसार मजा घेतली, एवढे मात्र दिसून आले. संसदेच्या आवारात श्वानास प्रवेश नसेल, पण चावा घेणारे तर संसदेच्या सभागृहांत बसलेले असून सरकार चालवत आहेत, अशी बेताल टिप्पणीही रेणुका चौधरी यांनी केली.
हा सगळा प्रकार हास्यास्पद, लज्जास्पद आणि संसदेच्या प्रतिष्ठेची खिल्ली उडविणारा आहेच; पण काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि संसदेचे सदस्य संसदेच्या कामकाजाविषयी, नियमावलीविषयी आणि प्रतिष्ठेविषयी जरादेखील गंभीर नाहीत, याची साक्ष देणारा आहे. जे खरोखरंच चावा घेतात ते तर संसदेच्या सभागृहात बसतात आणि देशावर राज्य करतात, हे रेणुका चौधरी यांचे वक्तव्य त्याहूनही अधिक आक्षेपार्ह असल्यामुळे त्यांच्याविरुद्ध हक्कभंगाचा प्रस्ताव मांडण्याचा सत्ताधाèयांचा विचार असल्याचे स्पष्ट होताच, चौधरी यांनी त्याचीही खिल्ली उडविली. असे झाले तर त्यालाही ‘मुँहतोड जबाब’ देण्याची आपली तयारी आहे, हे त्यांचे वक्तव्य म्हणजे, संसदीय कामकाजाच्या नियमांविषयी कोणतीही खंत वाटत नसल्याची स्पष्ट बेफिकिरी आहे. ही तर संसदेहूनही स्वतःस श्रेष्ठ मानण्याची मानसिकता म्हणावी लागेल. चावा घेणारे आणि लचके तोडणारे तर संसदेत बसले आहेत, सरकार चालवत आहेत, त्यावर कोणास काही वाटत नाही अशा शब्दांत त्यांनी या श्वानप्रवेश नाट्याचे समर्थन करताना सरकारची तुलनाच श्वानासोबत केली आणि अधिवेशनाचा पहिला दिवस नव्य-नाट्याचा नवा अंक म्हणूनच चर्चेचा ठरला. याच दिवशी सभागृहात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सदस्यांकडून कामकाजाच्या गांभीर्याविषयी एक अपेक्षा व्यक्त केली होती. संसदेचे सभागृह हे आपल्या स्थानिक राजकारणाचे हिशेब चुकते करण्याचे केंद्र ठरू नये आणि नाटकबाजी न करता येथे विधायकरीतीने आपल्या क्षमता सिद्ध कराव्यात, असे आवाहन त्यांनी केले होते. पण पहिल्याच दिवशी संसदेच्या परिसरात घडलेल्या या नाट्यमय प्रकारामुळे कामकाजातील सहभागाच्या विरोधकांच्या गांभीर्यावर प्रश्नचिन्ह उमटले आहे. तसेही संसदेच्या कामकाजात विरोधकांचा सहभाग केवळ अडथळे आणण्यापुरता आणि कामकाज बंद पाडण्यापुरताच असल्याचे वारंवार स्पष्ट होत गेले आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासूनच त्यांनी तसा पवित्रा घेतल्याचे दिसून येत आहे. या श्वान-प्रवेश नाट्याचा उत्कंठेचा क्षण रेणुका चौधरी यांनी स्वतःच्या आवाजात श्वानाच्या भुंकण्याचा सूर काढून गाजविला. जेव्हा आपल्या कृतीचे समर्थन करणे शक्य नसल्याचे ध्यानात येते, त्यासाठी शब्द सापडत नाहीत, तेव्हा असे काही नाट्यमय करावे लागते. चौधरी यांनी त्या क्षणी भुंकण्याचा आवाज काढून माध्यमांच्या प्रतिनिधींच्या प्रश्नास दिलेले उत्तर हा त्याचाच एक आविष्कार होता. संसदेच्या कामकाजात अडथळे आणायचे, कुत्र्याच्या आवाजात भुंकायचे, त्याचे समर्थन करायचे आणि सरकारची तुलना श्वानासोबत करून संसदेच्या सभागृहाच्या प्रतिष्ठेवरच प्रश्नचिन्हे उभी करायची, हा नवा प्रकार राजकारणात विरोधकांकडून सुरू झाल्याचे आता पुरते स्पष्ट झाले आहे. राजकारणातील गांभीर्य आणि संसदेच्या कामकाजाची प्रतिष्ठा पणाला लागल्याचेच हे लक्षण आहे. सातत्याने पाहाव्या लागणाèया पराभवानंतर सत्तारूढ भाजपाला सातत्याने लक्ष्य करून दुगाण्या झाडण्यात काँग्रेस नेत्यांनी आपली सारी शक्ती कधीपासूनच पणाला लावली आहे.renuka chowdhury जनतेने स्पष्टपणे नाकारल्याने आलेल्या नैराश्याचा हा परिणाम असू शकतो. त्या निष्पाप श्वानास प्रवेश नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर ज्या वाहनातून त्याला आणले गेले, त्याच वाहनातून त्याची पाठवणी झाली होती. पण तो मुद्दा तेथेच संपला नाही. त्यामुळे निर्माण झालेल्या वादातून सरकार आणि संसदेत बसणाèया सदस्यांची श्वानासोबत तुलना करून रेणुका चौधरी यांनी आपल्या मानसिकतेची पातळी दाखवून दिली आहे. संसदेत नाटकबाजी न करता गुणवत्तापूर्ण कामकाजाच्या जनतेच्या अपेक्षेस एका श्वानाने गाजविलेल्या नाटकामुळे गाजर दाखविले गेले आहेच; पण अशा नाटकबाजीचे राजकारण कोणत्या थराला नेऊन ठेवता येते, त्याचे प्रात्यक्षिक श्वानाहूनही हुबेहूब आवाजातील भुंकण्याच्या कलेतून एका दीर्घानुभवी राज्यसभा सदस्य असलेल्या महिलेच्या मानसिकतेतून देशाने पाहिले आहे. अशा घसरत्या मानसिकतेची गांभीर्याने दखल घ्यावयास हवी.