रेती तस्करांनी तहसीलमधून ट्रॅक्टर पळविला

तहसीलदारांची पोलिसांत तक्रार

    दिनांक :05-Dec-2025
Total Views |
दर्यापूर,
Daryapur news, sand smuggling,तालुक्यातील अवैध रेती वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी जप्त करण्यात आलेले ट्रॅक्टरच तहसील कार्यालयातून लंपास झाल्याची घटना घडली आहे . बुधवार, ३ डिसेंबरला मध्यरात्रीनंतर अज्ञात चोरट्याने नव्या शासकीय इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वाराची तोडफोड करून स्वराज कंपनीचा विनानंबर ट्रॅक्टर पळवून नेला.
 

Daryapur news, sand smuggling, 
दर्यापूर तहसीलदारांच्या चमुने रेती तस्करांवर कारवाईचा धडाका लावला आहे. गेल्या काही दिवसात अनेकांवर कारवाई करीत दंड वसूल करण्यात आला आहे; मात्र रेती तस्करी कमी होत नाही. सदर ट्रॅक्टर आणि ट्रॉली रेती भरलेली असताना पकडून तहसील कार्यालयाच्या आवारात जमा करण्यात आले होते. मात्र, ट्राली तशीच सोडून मूळ ट्रॅक्टर रात्रीच्या अंधारात तहसील कार्यालयाचे लोखंडी गेट तोडून लंपास करण्यात आला. याबाबत कळल्यावर तातडीने कारवाईसाठी हालचाल करण्यात आली. याबाबत पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली असल्याचे तहसीलदार डॉ. रवींद्र कानडजे यांनी सांगितले.
सुरक्षा व्यवस्थेचा बोजवारा
दर्यापूर तहसीलच्या नव्या इमारतीत गेल्या पाच महिन्यांत अवैध रेती तस्करीतून जप्त केलेल्या वाहनांच्या चोरीच्या घटना सातत्याने घडत आहेत. ही पाच महिन्यातील तिसरी घटना असल्याने गंभीर प्रकरण आहे. महसूल पथकातील तलाठी आणि कर्मचारी जीवाचे रान करून अवैध रेती तस्करी रोखत असतानाच, जप्त वाहने तहसील कार्यालयातूनच गायब होणे ही गंभीर बाब मानली जात आहे. , शासन वा प्रशासन यातून कोण जबाबदार, हे न सुटणारे कोडे निर्माण झाले आहे. दर्यापूर तहसील कार्यालयातील सलग चोरीच्या घटनांनी महसूल विभागातील सुरक्षा व्यवस्थेचा अभाव अधोरेखित करीत प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर गंभीर चर्चा सुरू झाली आहे