साधनेची क्रांती!

    दिनांक :05-Dec-2025
Total Views |
वेध  
 
- प्रफुल्ल व्यास
devvrat mahesh हातात महागडा मोबाईल, फटाके फोडत सायलेंसर काढलेल्या बुलेट, ओठांवर सिगारेट, तोंडात खर्रा आणि रात्रीचा मुक्काम कुठला तरी बार... असा प्रवास 100 पैकी 40 तरुणांचा सुरू आहे. देव आणि अध्यात्म तर त्यांच्यासाठी थोतांड आहे. तरुणींचं तर विचारूच नका! नागपुरात 2 डिसेंबरला एका विवाह कार्यात एक युवती चार मुलांच्या घोळक्यात उभी राहून भरदिवसा चौकात सिगारेट ओढत होती. म्हणजे मुलांची बरोबरी! नवीन पिढी कशी निघेल याविषयी स्वतंत्र चर्चाच अपेक्षित! पण, आपल्याच महाराष्ट्रातील अहिल्यानगरातील मुलाने जन्म घेतला की त्याच्या तपश्चर्येने केवळ गाव नाही तर संपूर्ण देश उजळला आहे. ते नाव म्हणजे देवव्रत महेश रेखे! वय 19 वर्षे आणि कामगिरी 50 दिवसांत शुक्ल यजुर्वेदातील तब्बल 2000 मंत्रांचे दंडकर्म पारायण! उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ त्याचा सत्कार केला तर त्याचा संकल्प सिद्धीस गेल्या गेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून देवव्रतचे अभिनंदन केले. दंडकर्म पारायण म्हणजे केवळ मंत्र उच्चारण नव्हे.
 
 
 
देवव्रत महेश रेखे
 
 
दंडकर्म म्हणजे नेमस्त ध्यान आणि कठोर साधना. रोज सकाळी सूर्योदयापूर्वी सुरू होणारा आणि दिवसभर चालणारा हा प्रवास फक्त स्नायूंचा नाही, तो मनाचा प्रवास आहे. देवव्रतने शरीर आणि मन दोन्ही एकाच शिस्तीत बांधले. 50 दिवस तोच ध्यास, तोच जप, तोच नियम! कुठे थकवा, कुठे मन डळमळले असेल; श्रद्धेने त्याचा पराभव केला. सोबत वडीलही होते. संकल्प पूर्ण झाला, फुलांचा वर्षाव केला गेला आणि सर्वात पहिले देवव्रतला त्याच्या वडिलांनी कवटाळले. बापासाठी अभिमान आणि मातेची कूस या निमित्ताने उजळून निघाली. देवव्रतसारख्या तरुणाला बाहेरील आकर्षणं दूर ठेवण्याची ताकद कशी आली? एका वाक्यात उत्तर द्यायचे झाल्यास ते म्हणजे संस्कार! त्याच्या मागे त्याचे आई-वडील उभे आहेत. त्यांनी त्याला संस्कृतीची नुसती ओळख करून दिली नाही तर ती जगायला शिकवली. ज्या दिवशी पारायण पूर्ण झाले, तेव्हा वडिलांनी त्याला हृदयाशी घट्ट कवेत घेतलेला फोटो सोशल मीडियावर पाहून अनेकांच्या डोळ्यांत पाणी आले. इतक्या तरुण वयात पोटच्या लेकराने संपूर्ण वंशाला नव्हे, तर देशाला अभिमान वाटावा अशी कामगिरी केली तर त्या क्षणी भावना बोलक्या झाल्या आणि देवव्रत त्या भावनांचा धनी ठरला. देवव्रत या नावाला भीष्म पितामहांची परंपरा लाभली.devvrat mahesh देवव्रतच्या निमित्ताने महाभारतातील भीष्म पितामहांची आठवण झाली. त्यांची वचनपूर्ती, निष्ठा आणि त्याग या तीन गुणांची व्याख्या त्याच नावात दडलेली आहे. त्या नावाचे सार्थक केवळ कौतुकासाठी नव्हे, तर वेदांची परंपरा जगवण्याचे कार्य आधुनिक भीष्माने केले आहे. शुक्ल यजुर्वेदाची 2000 मंत्रांची निखळ अचूकता, आवाजातील प्रत्येक स्वर, श्वासातील प्रत्येक हलचल, अर्थाच्या प्रत्येक छटा या तपश्चर्येची साक्ष होती. वेदांची परंपरा ही शब्दांची नाही तर संपूर्ण विश्वाशी संवाद साधण्याची कला आहे. देवव्रतने त्या विश्वाशी जोड निर्माण केली आहे. संस्कृती म्हणजे मागासपणा नाही. ती आपल्या मुळांची ओळख. वृक्ष उंच वाढायचा असेल तर त्याची मुळं खोल असावी लागतात. देवव्रतने या आधुनिक युगात वैश्विक वातावरणात जमिनीच्या वर तोंड काढलेली मुळं खोलवर रुजवली. वेद म्हणजे देव घरातली वस्तू नव्हे ते जगण्याचे तत्त्वज्ञान आहे. जशी मनुस्मृती! ती कोण्या एका जातीसाठी नाही तर तेही एक आचारसंहिता शिकवते. तिचे कव्हरही न उघडून बघणारे मनुस्मृतीविषयी छाती बदडत फिरतात. देवव्रतविषयीही समाजमाध्यमावर टीकाचा भडीमार होतो आहे. तंत्रज्ञान शिका, प्रगती करा, पण आपल्या मुळांना विसरू नका. करीअर महत्त्वाचेच, पण चरित्र त्याहून महत्त्वाचे. दंडकर्मातून त्याने स्वतःला जिंकले आणि विजय मिळविला. आता घराघरातून लहान मुलांना देवव्रत सांगितला गेला पाहिजे, शिकवला पाहिजे. तरुणाईनेही डोळे उघडे ठेवून देवव्रतच्या व्रतस्तपणावर चर्चा केली पाहिजे. कारण त्याच नवीन पिढीतून एक देवव्रत जन्माला येतो. हाच देवव्रत आजच्या पिढीचा कलंक पुसून टाकेल. दिशा दाखवणारे दिवे जन्माला येतात तेव्हा काळाचा अंधार कमी होतो. देवव्रत त्यातलाच एक दिवा ठरावा.त्याच्या संकल्पातून भारत माता अजून उजळून निघो...?
 
9881903765