महावितरण कार्यालयावर शेतकर्‍यांचा ठिय्या

विस्कळीत वीजपुरवठ्यामुळे संताप

    दिनांक :05-Dec-2025
Total Views |
धामणगाव रेल्वे,
mahavitaran office शेतकर्‍यांना योग्य, नियमित आणि वेळेवर विद्युत पुरवठा न मिळाल्यामुळे जुना धामणगाव महावितरण कार्यालयासमोर गुरुवारी शेतकर्‍यांनी ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनात शेतकर्‍यांनी गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या वीज समस्यांचा जोरदार निषेध नोंदवला. गेल्या काही दिवसांपासून शेतीसाठी आवश्यक असलेली वीज वारंवार खंडित होत असून, रात्रीच्या वेळीही पुरवठा ठप्प राहिल्याने शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होत आहे.
 
 

dhamngao 
 
 
 
विशेष म्हणजे, एका इलेक्ट्रिकच्या सरकारी ठेकेदाराला मात्र २४ तास अखंड वीजपुरवठा सुरू असल्याची बाब शेतकर्‍यांनी उघड केली, तर दुसरीकडे सामान्य शेतकर्‍यांच्या लाईनमध्ये वारंवार खंड पडत असल्याने पिकांच्या वाढीवर परिणाम होत असल्याची तक्रार केली. आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांची दखल घेत महावितरण विभागाचे कनिष्ठ अभियंता आशिष पवार यांनी तातडीने तपास करून वीजपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले. अतिरिक्त भार कमी करण्यासाठी आणखी ट्रान्सफॉर्मर बसवले जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
दरम्यान, सध्या रब्बी हंगाम सुरू असून जुना धामणगाव परिसरात मोठ्या प्रमाणात गहू व हरभर्‍याची पेरणी करण्यात आली आहे; मात्र, महावितरणकडून जाहीर केलेल्या वेळेत विद्युत पुरवठा न झाल्याने शेतकर्‍यांना मानसिक तसेच आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. जाहीर वेळापत्रकानुसार शेतकरी व मजूर ओलीत करण्यासाठी शेतात जातात; परंतु वीजपुरवठा नसल्याने काम ठप्प पडत असून याचा थेट परिणाम पिकांवर होत आहे.mahavitaran office या आंदोलनामुळे वीजपुरवठ्याबाबत शेतकर्‍यांना भेडसावणार्‍या समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले गेले असून पुढील काही दिवसांत कोणती कार्यवाही होते, याकडे शेतकर्‍यांचे लक्ष लागले आहे. या वेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मोहन सिंघवी, राजेंद्र लाहोटी, नरेंद्र व्यवहारे, नरेंद्र ढाले, प्रमोद ढाले, मंगेश ढाले, विनोद कापडे, नंदकिशोर रोंघे, घनश्याम लाहोटी यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.