गोंदिया,
Gondia highway accident, राष्ट्रीय महामार्गावर उभ्या ट्रकला खासगी प्रवासी बसची धडक बसून एका प्रवासी महिलेचा जागीच मृत्यू तर १९ प्रवासी जखमी झाल्याची घटना शुक्रवारी रात्री १२.३०वाजताच्या सुमारास देवरी तालुक्यातील धोबीसराड गावाजवळ राष्ट्रीय महामार्ग क्र. ५३ वर घडली. सुनीता हेमलाल बघेल (४५) रा. गहराटोला जि. खैरागड (छ.ग.) असे अपघातात ठार झालेल्या प्रवासी महिलेचे नाव आहे. यात बस चालक व क्लिनरसह ९ प्रवासी गंभीर झाले असताना १० प्रवासी किरकोळ जखमी झाले आहे. सर्व गंभीर जखमींना उपचारासाठी गोंदिया व रायपूर येथील रुग्णालयात हलविण्यात आले असून इतर जखमींवर देवरी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या Gondia highway accident, माहितीनुसार, आरोपी ट्रॅक चालक दिनेश शिवदास टेकाम (२५) रा. चंद्रपूर/कोका ता. जि. भंडारा याने आपले ट्रक क्र.सी.जी.०४ एन.टी.५०९६ मधील इंधन संपल्याने राष्ट्रीय महामार्ग क्र. ५३ वर धोबीसराड शिवारात उभे केले होते. मात्र, यावेळी त्याने ट्रकचे इंडिकेटर किंवा कोणतेही संकेत सुचक सुरू ठेवले नसल्याने मागून येत असलेल्या खासगी प्रवासी बस क्र. सी.जी. १९ बी.एल. ८००१ चा चालक चंद्रशेखर चौधरी यास महामार्गावर उभा असलेला ट्रक दिसून आला नाही. त्यामुळे उभ्या ट्रकला बसची जोरदार धडक बसली. यात सुनीता बघेल यांचा जागीच मृत्यू झाला तर चालक चंद्रशेखर चौधरी व क्लिनर मुकेश ठाकूर दोघेही राहणार रायपूर (छ.ग.) यांच्यासह भरत पटेल, रा. निमोह, राजकुमार निषाद, रा, लोहारा/कबीरधाम, कृष्णा ठाकूर, नीलकमल यादव रा. सुकरी जि. खैरागड, आनंदिया राजेश पटेल रा. लखनपूर/कबीरधाम, अरुण हेमलाल बघेल, मधू नरेश बंधे, रा. भालुकोन्हा असे ९ प्रवासी गंभीर जखमी झाले. याचबरोबर बसमध्ये बसलेले इतर १० प्रवासीही किरकोळ जखमी झाले. मध्यरात्रीच्या सुमारास प्रवासी झोपेत असताना झालेल्या या अपघातामुळे प्रवाशांची तारांबळ उडाली. दरम्यान, प्रत्यक्षदर्शींनी घटनास्थळाकडे धाव घेत घटनेची माहिती देवरी पोलिसांना दिली. यावेळी पोलिस निरीक्षक प्रवीण डांगे यांनी ताफ्यासह घटनास्थळ गाठून गावकर्यांच्या मदतीने जखमी प्रवाशांना बसच्या बाहेर काढले. सर्व जखमींना देवरी येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. यात ९ गंभीर जखमी प्रवाश्यांपैकी तिघांना छत्तीसगड राज्यातील रायपूर येथे तर ६ प्रवाश्यांना गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले. घटनेची नोंद देवरी पोलिसांनी केली असून पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक मुकेश राठोड करीत आहेत.