नागपूर,
baba traders नागपूरच्या कामठी परिसरात बेकायदेशीर मांसव्यवहाराचा मोठा भांडाफोड झाला आहे. ‘बाबा ट्रेडर्स’ नावाने चालणाऱ्या गोदामावर महाराष्ट्र गौसेवा आयोग आणि स्थानिक अधिकाऱ्यांनी संयुक्त कारवाई करत तब्बल ३० ते ३५ टन बेकायदेशीर गोमांस तसेच गोमांसापासून बनविलेल्या १०० कॅन तूपाचा मोठा साठा जप्त केला. आयोगाचे सदस्य सुनील सूर्यवंशी यांनी आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
जप्त केलेल्या तुपाचा नमुना तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आला असला तरी आठ दिवस उलटूनही अहवाल न मिळाल्याने प्रकरण अधिकच गुंतागुंतीचे बनले आहे. कामठी परिसरात गेल्या अनेक महिन्यांपासून बेकायदेशीर कत्तलखाने, गुरांची वाहतूक आणि गोमांस विक्रीचे व्यवहार सुरू असल्याची तक्रार आयोगाकडे वारंवार मिळत होती. घटनेनंतर अन्न व औषध प्रशासन, तसेच प्रदूषण नियंत्रण विभागाने तात्काळ हस्तक्षेप करावा, अशी मागणी आयोगाने केली आहे. प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी गौसेवा आयोगाने विशेष समिती स्थापन केली होती. ४ डिसेंबर रोजी समितीने घटनास्थळी पाहणी करून कागदपत्रे, जप्त माल, स्थानिक चौकशी आणि प्रयोगशाळेतील नमुन्यांवर आधारित अहवाल आयोगाला सादर केला आहे. समितीने पोलिस आयुक्त, जिल्हाधिकारी आणि मुख्यमंत्री यांच्याकडे कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, या कारवाईनंतर काही स्थानिक संघटनांनी समितीकडे धक्कादायक दावा केला आहे की कामठी आणि नागपूरमधील काही बिर्याणी दुकानदारांकडे गोमांसाची बेकायदेशीर विक्री होत आहे.baba traders समितीने या आरोपांचीही स्वतंत्र चौकशी करण्याची तयारी दर्शवली आहे. विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान, भारत माता सेवा संघटना आणि श्री शिवाई युवा फाउंडेशनसह अनेक हिंदुत्ववादी संघटनांनी गोसेवा आयोगाकडे निवेदन देत तातडीने कठोर कारवाईची मागणी केली. त्यांचा आरोप आहे की या बेकायदेशीर व्यापारामागे मोठे नेटवर्क कार्यरत असून सर्व संबंधितांची चौकशी करून अपराधींवर कठोर पावले उचलावीत.