आरमोरी,
tiger attacks इंजेवारी-देऊळगाव परिसरात वाघाचा उच्छाद सुरूच असून गेल्या महिनाभरात भीतीचे सावट अधिक गडद होत चालले आहे. वाघाने आतापर्यंत पाच महिलांवर हल्ले केले असून त्यात देऊळगाव येथील दोन महिलांचा वाघाच्या मृत्यू झाला. तर डोंगरसावंगी येथील एका महिलेला गंभीर दुखापत झाली. या सलग घटनांमुळे ग्रामीण भागातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असताना विशेषतः महिलांना शेतात जाणे धोकादायक बनले आहे. अनेकांची शेतातील कामे तात्पुरती बंद आहेत. 2 डिसेंबर रोजी इंजेवारी येथील एका वृद्ध महिलेला शेतात काम करण्यासाठी जात असताना वाघाने ठार मारल्याची हृदयद्रावक घटना घडली. मंगळवारी दुपारी 4 वाजताच्या सुमारास घडलेल्या घटनेने परिसरातील भय आणखी तीव्र झाले. त्यामुळे या नरभक्षक वाघाचा तात्काळ बंदोबस्त करा, अन्यथा तिव्र आंदोलन करण्याचा इशारा आमदार रामदास मसराम यांनी वनविभागला दिला आहे.
याआधीही 27 नोव्हेंबर रोजी देऊळगाव येथे आमदार रामदास मसराम यांनी वनविभागाच्या अधिकार्यांची बैठक घेतली होती. त्यावेळी त्यांनी प्रशासनाला कडक इशारा देत म्हटले होते. या गंभीर प्रकरणाकडे प्रशासनाचे स्पष्ट दुर्लक्ष केल्याने गुरुवारी इंजेवारी येथे आमदार रामदास मसराम यांच्या अध्यक्षतेखाली बैठक धेण्यात आली. यावेळी नरभक्षक वाघाचा बंदोबस्त करण्यात यावे, अन्यथा 6 डिसेंबरला देऊळगाव येथे तीव्र आंदोलन छेडले जाईल. असा इशारा देण्यात आला. इंजेवारी मधील बैठकीत आमदार मसराम यांनी पिंजरे लावण्याची प्रक्रिया वेगाने करणे, जंगलात गस्त वाढविणे, ड्रोनच्या मदतीने निरीक्षण वाढविण्याचे तसेच गावागावात जनजागृती मोहीम राबविण्याचे निर्देश संबंधित अधिकार्यांना देण्याचे सांगितले. मृत आणि जखमींच्या कुटुंबांना तातडीने मदत देण्याची मागणीही ग्रामस्थांनी केली.
याप्रसंगी आमदार रामदास मसराम यांनी नरभक्षक वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या इंजेवारी येथील कुंदा मेत्राम यांच्या घरी भेट देऊन कुटूंबाचे सात्वन केले. तातडीने मदत देण्याचे आदेश वन उपविभागीय अधिकारी सुर्यवंशी यांना दिले.
यावेळी माजी खासदार अशोक नेते, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मिलिंद खोब्रागडे, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष दिलीप घोडाम, उपविभागीय वनअधिकारी सुर्यवंशी, कवडु सहारे, अमोल मारकवार, बंडु खोडवे, सरपंच अल्का कुकडकार, सदानंद कुथे, तुलाराम पात्रिकर, ईश्वर खोडवे, ग्रामसेवक रामटेके, क्षेत्र सहायक दोळके, वनरक्षक भरे यासह नागरिक, महिला उपस्थित होते.