कारंजा लाड,
school strike, खासगी अनुदानित, अंशतः अनुदानित आणि विना-अनुदानित शाळांतील मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी आपापल्या प्रलंबित मागण्यांसाठी ५ डिसेंबर रोजी ‘शाळा बंद’ आंदोलन जाहीर केले आहे. त्या पार्श्वभूमीवर कारंजा तालुयातील १३७ जिल्हा परिषद शाळा मधील ३४० शिक्षक सहभागी झाले. त्यामुळे २ जिल्हा परिषद हायस्कूल व ४ उर्दू शाळा वगळता सर्व जिल्हा परिषद शाळा बंद होत्या. मात्र, या आंदोलनात सहभागी झाल्यास एक दिवसाचे वेतन कपात करण्याचा इशारा शिक्षण विभागाने दिल्याने शिक्षक संघटनांमध्ये प्रचंड रोष आहे. विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन आदेश काढल्याचे विभागाकडून सांगितले जात असले तरी,हे आंदोलन दडपण्याचा प्रकार असल्याचे शिक्षक संघटनेकडून बोलल्या जात आहे.
शिक्षकांच्या सेवा अटीतील अडचणी,वेतन श्रेणीतील विसंगती, टीईटी व इतर भरती प्रक्रियेतील विलंब, अतिरिक्त गैर-शैक्षणिक कामांचा ताण या सर्व प्रश्नांकडे सरकार सातत्याने कानाडोळा करत आहे. तसेच मागण्या मार्गी लागत नाहीत, पण आंदोलन जाहीर होताच वेतन कपातीचा आदेश काढला जातो. विद्यार्थ्यांच्या हिताचे कारण पुढे करून शिक्षकांना गप्प करण्याचा हा प्रयत्न असल्याची टीका संघटनांनी केली. तर डिसेंबर मध्ये विविध परीक्षा, उपक्रम आणि शैक्षणिक नियोजन सुरू असताना अचानक ‘शाळा बंद’ आंदोलन केल्याने शैक्षणिक वर्षाचा समतोल बिघडतो.त्यामुळेविद्यार्थी हितासाठीच वेतन कपातीचा निर्णय आवश्यक असल्याचे शिक्षण विभागाचे म्हणणे आहे.
शासनाच्या आदेशानुसार कारवाई केल्या जाईल
कारंजा तालुयात जिल्हा परिषदेच्या एकूण १४१ शाळा आहेत.त्यापैकी कामरगाव आणि उंबर्डा बाजार येथील २ जिल्हा परिषद हायस्कूल मधील शिक्षक संपात सहभागी झाले नसल्याने तसेच किन्ही रोकडे, पोहा, मनभा आणि कामरगाव येथील उर्दू शाळा शिक्षण सेवकांच्या वतीने सुरू आहेत. ३४० शिक्षक संपात सहभागी झालेत. त्यामुळे शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले. शासनाच्या पुढील आदेशानुसार संपात सहभागी झालेल्या शिक्षकावर प्रशासकीय कारवाई केल्या जाईल.
श्रीकांत माने, गटशिक्षणाधिकारी