वर्धा,
Wardha municipal elections वर्धा, हिंगणघाट, आर्वी, पुलगाव व सिंदी रेल्वे नगरपालिकेसाठी मंगळवार २ डिसेंबरला मतदान झाले. सीलबंद ईव्हीएम स्ट्रॉग रुममध्ये ठेवण्यात आल्या आहेत. स्ट्रॉगरुम मधील ईव्हीएमच्या सुरक्षेसाठी शस्त्रधारी जवान, स्थानिक पोलिस अधिकारी, कर्मचारी खडा पहाराच देत आहेत. पाचही नगर पालिकांतील इव्हीएम बंद असलेल्या गोडाऊनच्या चाब्या उपजिल्हाधिकारी व तहसीलदार दर्जाच्या अधिकार्यांकडे देण्यात आल्या असल्याची माहिती जिल्हाधिकारी वान्मथी सी. यांनी दिली.
वर्धा जिल्ह्यात शांततेत मतदान झाले. मतदानानंतर पोलिंग पार्टींनी सिलबंद केलेल्या ईव्हीएम स्ट्रॉग रुममध्ये ठेवण्यात आल्या आहेत. वर्धेत क्रीडा संकूल, हिंगणघाट येथे तहसील कार्यालय, आर्वी येथे गांधी विद्यालय, पुलगाव व सिंदी रेल्वे येथे नगरपालिकेच्या आवारातीलच स्ट्रॉग रुममध्ये मतदान ईव्हीएम सुरक्षीत ठेवण्यात आल्या आहेत. या प्रत्येक स्ट्रॉग रुमच्या व्यवस्थापनाकरिता पाचही नगर पालिकांमध्ये प्रत्येकी दोन अधिकार्यांची नियुत करण्यात आली आहे. यात वर्धेची जबाबदारी उपजिल्हाधिकारी गणेश खताळे व तहसीलदार संदीप पुंडेकर यांना देण्यात आली आहे. हिंगणघाट येथे उपविभागीय अधिकारी आकाश अवतारे आणि तहसीलदार हरीश काळे, आर्वी येथे उपजिल्हा निवडणूक अधिकारी अनिल गावित व तहसीलदार हरीश काळे, पुलगाव येथे उपविभागीय अधिकारी दीपक कारंडे तर तहसीलदार अनिकेत सोनावणे, सिंदी रेल्वे येथे उपजिल्हाधिकारी श्रीपती मोरे आणि तहसीलदार बबीता आळंदे यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे. गोडाऊन म्हणजे स्टाँगरूमला दोन चाब्या असलेले कुलूप लावण्यात आले असुन पहिली चाबी उपजिल्हाधिकारी तर दुसरी चाबी तहसीलदार दर्जाच्या अधिकार्यांकडे सोपवण्यात यावी असे आदेश देण्यात आले आहे.
परिसरात ईव्हीएमच्या Wardha municipal elections सुरक्षेसाठी स्थानिक पोलिस व एसआपीचे जवान तैनात करण्यात आले आहे. याशिवाय स्ट्रॉग रुम परिसरात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये तसेच प्रत्यक्ष हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी आवश्यक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरेही बसविण्यात आले आहेत. या व्यतिरिक्त सुरक्षा अलार्म सिस्टीमही लावण्यात आली आहे. दरदिवशी निवडणूक निर्णय अधिकार्यांकडून स्ट्रॉग रुम परिसरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीचे चित्रिकरणही तपासले जात आहे.
सुरक्षेच्या दृष्टीने संबंधित ५ स्टॉग रुम परिसरात स्थानिक पोलिस, एसआरपीचे जवान तैनात करण्यात आले आहे. शिवाय दरदिवशी प्रशासनातील जबाबदार बड्या अधिकार्यांकडून स्टॉग रुमला भेटी दिल्या जात आहे. तर आकस्मिक भेटीही अधिकारी देत आहेत.