sushil gajbhiye नैसर्गिकरित्या जंगलात वाढणारे तुंबा हे एक जंगली वेलवर्गीय फळ! त्याच्या काही प्रजाती विषारी आणि अति कडू असल्यामुळे दुर्लक्षित हे फळ, नागपूरकरांसाठी मात्र सन्मानदायक ठरले आहे. नागपूरचे हस्तशिल्पी सुशील गजभिये यांनी साकारलेल्या देखण्या ‘तुंबा लॅम्प’ची दखल खुद्द राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी घेतली आणि कलाकाराला शाब्बासकीची थापही दिली.
हस्तशिल्प मंत्रालय आणि दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राने प्रत्येक वेळी आवर्जून मदत केली आणि संधी दिली. प्राचीन काळापासून महाराष्ट्रासह छत्तीसगड आणि ओदिशाच्या ग्रामीण आणि आदिवासी जीवनात तुंब्याचा कल्पकतेने वापर केला जातो. वजनाला हलका पण मजबूत असलेले हे कडू फळ सच्छिद्र असल्यामुळे वीणा आणि सतारीसारखे वाद्य बनविण्यासाठीही त्याचा वापर केला जातो. तापत्या उन्हाळ्यात पाणी थंड ठेवून ते साठविण्यासाठी हे तुंबे वापरले जातात, अशी माहिती गजभिये यांनी दिली.
साधारण 6 महिन्यांत वेलींवरील तुंबे तोडण्यायोग्य होतात. त्यातील गर काढून, साधारण 4 महिने ते पाण्यात भिजवावे लागते. नंतर, जंगली भेंडीचा चीक आणि बाभळीच्या फांद्यांच्या राखेचे मिश्रण तुंब्याला आतून लावून छान वाळवून घेतात.
तापवलेल्या लोखंडी खिळ्याला तापवून तुंब्यावर कोरीव काम करतात. फार उपकरणे वापरता येत नाहीत. तुंब्याचा आकार बघून, त्यावरचे डिझाईन ठरवले जाते. ही एक कठीण आणि गुंतागुंतीची प्रक्रीया असल्याचे गजभिये सांगतात.
नागपूर आणि वर्धा जिल्ह्यात जवळपास सोळा प्रजातींचे तुंबे मिळतात. गेली 10 वर्षे या क्षेत्रात असलेल्या गजभियेंची बोरधरणाजवळ स्वत:ची शेती आहे. पण, ते तुंब्याच्या शोधात रानोमाळी फिरत असतात. शेतातच तुंब्यांच्या वेलीची लागवड का करीत नाही? असे विचारल्यावर, ती वेल केवळ निसर्गाच्या सान्निध्यात वाढते. लागवड केली तरी आजूबाजूला दोन वेली रुजत नाहीत आणि त्यांना आवश्यक ते नैसर्गिक वातावरण आपण देऊ शकत नाही. म्हणून, तुंब्यांमधून मिळणाऱ्या बिया मी पुन्हा त्याच ठिकाणी नेऊन टाकतो, जेणेकरून नवीन वेली रुजतील, अशी माहिती गजभिये देतात.
वर्षाकाठी जास्तीत जास्त 2 हजार कलाकृती तयार होतात.sushil gajbhiye त्यांचा नैसर्गिक रंग कलारसिकांना विशेषत्वाने आवडतो. त्याला कोणतेही पॉलिश किंवा पेंट केला जात नाही. याविषयीची एक आठवण त्यांनी सांगितली. ‘पहिल्यांदा या लॅम्पला मी पिवळा रंग दिला. दुबईच्या एका शेखला तो खूप आवडला. पण, त्याला तो नैसर्गिक रंगात हवा होता. मी तो घासून-धुवून त्यावरचा रंग काढला आणि मग त्याने तो 25 हजाराला विकत घेतला. या अनुभवानंतर मी या लॅम्पला रंगविणे बंदच केले,’ गजभिये म्हणाले.