भंडारा,
Bhandara municipal elections नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनंतर मतदान प्रक्रियेत वापरण्यात आलेल्या ईव्हीएम तसेच मतदान साहित्याची पूर्ण सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी भंडारा नगरपालिकेचा स्ट्रॉंग रूम वैनगंगा सभागृह, पोलीस मुख्यालय येथे तयार करण्यात आला आहे. आज या स्ट्रॉंग रूमला प्रभारी जिल्हाधिकारी राजेंद्रकुमार जाधव यांनी भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी शैलजा वाघ दांदळे उपस्थित होत्या.
या पाहणीदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी सुरक्षिततेसंबंधी सर्व बाबींचा सविस्तर आढावा घेतला. स्ट्रॉंग रूम परिसरातील सीसीटीव्ही यंत्रणा, तैनात सुरक्षा पथके, प्रवेश नियंत्रण, रात्रपाळीतील गस्त व्यवस्था तसेच सुरक्षा नोंदवही यांची तपासणी करण्यात आली. तसेच स्ट्रॉंग रूमच्या बाहेरील परिघात अनधिकृत व्यक्तींना प्रवेश रोखण्यासाठी करण्यात आलेल्या बंदोबस्ताचीही माहिती घेण्यात आली.प्रभारी जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना सुरक्षेच्या बाबतीत सतर्क राहण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या. स्ट्रॉंग रूम परिसरात जिल्हा प्रशासन, पोलीस विभाग आणि निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसार सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.