new year is celebrated नवीन वर्षाची चाहूल लागली की बहुतेकांना पार्टी, डीजे, रात्रभर गोंधळ आणि ट्रॅफिक जामचे चित्र डोळ्यांसमोर उभे राहते. पण प्रत्येकालाच अशा गोंगाटात वर्षाची सुरुवात करायची असते असे नाही. काहीजणांना शांतता, निसर्गाची कुशीतली ऊब आणि मनाला स्पर्श करणारी जागा हवी असते, जिथे नव्या वर्षाचे स्वागत खऱ्या अर्थाने ‘हॅपी’ वाटेल. गोव्याची प्रचंड गर्दी किंवा मनालीचा थकवणारा ट्रॅफिक टाळायचा असेल, तर भारतातील काही शांत, निसर्गरम्य ठिकाणे तुमचे नवीन वर्ष खास बनवू शकतात.
मसुरीच्या जवळच असलेले लँडोर हे त्यातील एक सुंदर ठिकाण. पाइनच्या दाट जंगलांनी वेढलेले हे छोटेसे ब्रिटिशकालीन वसलेले शहर शांततेसाठी प्रसिद्ध आहे. येथील थंड हवा, सुंदर ट्रेल्स आणि विंटर लाईनचे मन मोहणारे दृश्य वर्षाच्या सुरुवातीला एक वेगळाच आनंद देतात. शांत कॅफेमध्ये बसून घेतलेली कॉफीही इथे खास वाटते.
हिमाचल प्रदेशातील तीर्थन व्हॅलीही तितकीच आकर्षक. कुल्लू मनालीच्या तुलनेत खूपच शांत, नैसर्गिक सौंदर्याने नटलेली ही खोरे निसर्गप्रेमींसाठी स्वप्नवत आहे. वाहत्या नदीचा मधुर आवाज, लाकडी घरे, आजूबाजूचे घनदाट जंगल… इथे काही तास घालवले तरी शहराचा सारा थकवा गळून जातो. ट्रेकिंग, मासेमारी किंवा नदीकाठी बसून पुस्तक वाचणे – या सर्वांत नवीन वर्षाचे स्वागत विलक्षण समाधान देते.
समुद्रकिनाऱ्यावर शांततेचा अनुभव घ्यायचा असेल तर गोव्याऐवजी कर्नाटकातील गोकर्ण सर्वोत्तम. ओम बीच आणि पॅराडाईज बीचवरील स्वच्छ, शांत किनारे आणि समुद्राच्या लाटांचा नाद तुमच्या मनात एक विशेष शांतता भरून जातात. येथे पार्टीचे वातावरण आहे, पण ते आवाजापेक्षा निवांतपणाला जास्त महत्त्व देणारे. वाळूत अनवाणी चालत, समुद्राशी संवाद साधत वर्षाची सुरुवात करणारा हा अनुभव अविस्मरणीय ठरतो.
इतिहास आणि पुरातन वास्तुकलेचा मोह असणाऱ्यांसाठी मध्य प्रदेशातील ओरछा शहर स्वर्गाहून कमी नाही. बेतवा नदीकाठी वसलेले हे शहर किल्ले, राजवाडे, मंदिरं आणि छत्रींनी सजलेले आहे.new year is celebrated गर्दी कमी असल्यामुळे राजेशाही वैभव शांततेत अनुभवता येते. संध्याकाळी बेतवा नदीच्या काठावरून पाहिलेला सूर्यास्त मनाला विलक्षण शांतता देतो.

ईशान्य भारताकडे वळायचे ठरवले, तर अरुणाचल प्रदेशातील झीरो व्हॅली निश्चितच नव्या वर्षासाठी एक परिपूर्ण ठिकाण ठरू शकते. हिरवीगार भातशेती, पाइनची दाट जंगले, आदिवासी संस्कृतीचा निवांतपणा येथे सगळेच काही वेगळे आणि अलौकिक आहे. इतकी शांतता की निसर्गाच्या लयीत स्वतःचे हृदयाचे ठोकेही ऐकू येतील.
या सर्व ठिकाणांची खासियत एकच इथे शांततेची भेट मिळते. गोंगाटापासून दूर, स्वतःला पुन्हा सापडण्याची आणि वर्षाची सुरुवात सकारात्मक उर्जेसह करण्याची संधी ही ठिकाणे देतात. नवीन वर्ष शांततेत, निसर्गाच्या सान्निध्यात, नव्या आशांनी भरलेले असेल तर त्याहून सुंदर सुरुवात दुसरी कोणती?