नाशिक,
85 Gram Panchayat members disqualified नाशिकच्या बागलाण तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झालेल्या तब्बल 85 सदस्यांना अपर जिल्हाधिकारी यांनी एकाचवेळी अपात्र ठरविल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. या कारवाईमागचे कारण म्हणजे निवडणूक लढविणाऱ्या सदस्यांनी जात वैधता प्रमाणपत्र वेळेत सादर न केल्यामुळे प्रशासनाने ही कठोर पावले उचलली आहेत. जानेवारी 2021 मध्ये झालेल्या ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत राखीव जागांसाठी निवडणूक लढवणाऱ्या व्यक्तींना निवडणूक निकालानंतर 12 महिन्यांच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक होते. मात्र, अनेक सदस्यांनी ही प्रक्रिया पूर्ण केली नाही. त्यानंतर, महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रित अधिसूचनेनुसार 10 जुलै 2023 पर्यंत निवडून आलेल्या सदस्यांना 12 महिन्यांची अतिरिक्त मुदत देण्यात आली होती, जी 9 जुलै 2024 रोजी संपुष्टात आली. त्यानंतरही सदस्यांनी प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे अपर जिल्हाधिकारी यांनी हे सदस्य अपात्र घोषित केले आहेत.
या अपात्रतेत तालुक्यातील 36 ग्रामपंचायतींतील विविध पक्षाचे 1 ते 9 सदस्यांचा समावेश आहे. अपात्र घोषित झालेल्या ग्रामपंचायतींची यादी अशी आहे: अंबासन ३, इजमाने ३, औंदाणेपाडा १, करंजाड ३, कुपखेडा १, कोटबेल १, कोळीपाडा ३, खमताने ४, जुने शेमळी ३, ठेंगोडा २, तरसाळी १, ताहाराबाद २, दरेगाव १, द-हाणे २, देवळाणे १, द्याने १, धांद्री ५, नळकस २, नवी शेमळी २, निताने २, पिंपळदर १, बोढरी ३, ब्राह्मणगाव ३, मळगाव भामेर ३, मोराने सांडस २, यशवंत नगर २, रातीर १, रामतीर २, लखमापूर ९, लाडूद ५, वाडीपिसोळ ३, विंचुरे १, शेवरे १, श्रीपुरवडे २, सारदे ३, सोमपूर १ यांचा समावेश आहे. जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे की ही कारवाई स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षणाचा नियम आणि नियमानुसार करण्यात आली आहे. अपात्र झालेल्या सदस्यांना आता पुढील प्रशासनिक प्रक्रिया आणि न्यायालयीन मार्गदर्शनानुसार पुढील निर्णय घेण्यात येणार आहे.