तभा वृत्तसेवा
आर्णी,
ladki-bahin-scheme : नगरपरिषद निवडणुकीत महायुतीचे प्रमुख तिन्ही पक्ष स्वतंत्र लढल्याने लाडक्या बहिणींचा चांगलाच गोंधळ उडाला. राज्य पातळीवर एकत्र असलेल्या भाजपा, शिंदे गट आणि अजित पवार गटाने प्रचारात लाडकी बहीण योजनेचा डंका पिटला. मात्र तिन्ही पक्ष वेगवेगळे समोर आल्याने मतदान नक्की कोणाला करायचे, असा प्रश्न लाडक्या बहिणींना पडल्याने त्या पेचात पडल्या होत्या.
आर्णी शहरातील नगरपरिषद निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया मंगळवार, 2 डिसेंबरला पार पडली. या निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांनी आपले अस्तित्व सिद्ध करण्यासाठी स्वतंत्रपणे उमेदवार रिंगणात उतरवले होते. विशेष म्हणजे, विधानसभेत मांडीला मांडी लावून राज्य कारभार करणारे भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस (अप) आणि शिवसेना (शिंदे गट) हे तिन्ही मित्रपक्ष नगरपरिषदेच्या आखाड्यात एकमेकांसमोर उभे ठाकले होते.
सत्तेत असलेल्या या तिन्ही पक्षांच्या उमेदवारांनी प्रचारादरम्यान स्थानिक विकासांपेक्षा ‘लाडकी बहीण’ योजनेवरच अधिक भर दिला. मोठमोठ्या नेत्यांच्या सभा आणि कॉर्नर सभांमधून ‘आमचे सरकार लाडक्या बहिणींना दरमहा दीड हजार रुपये देत आहे,’ असाच उल्लेख वारंवार होत होता. मात्र, जेव्हा या लाडक्या बहिणी मतदान केंद्रावर पोहोचल्या, तेव्हा त्यांच्यासमोर भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांची वेगवेगळी चिन्हे पाहून मोठा पेच निर्माण झाला होता.
योजना एकाच सरकारची, पण श्रेय घेणारे दावेदार तीन, या राजकीय विरोधाभासामुळे लाडक्या बहिणींनी नेमके कोणाच्या पारड्यात मत टाकले, हे आता मतमोजणीनंतरच स्पष्ट होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुतीत झालेली ही बिघाडी आणि त्यामुळे उडालेला मतदारांचा गोंधळ आगामी निवडणुकांमध्येही पाहायला मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कोणत्या भावाच्या पक्षाला मतदान करावे, या विचारात महिला मतदार गोंधळून गेल्या, हे मात्र खरे.