'आशा’चा दमदार ट्रेलर प्रदर्शित

रिंकू राजगुरूच्या भूमिकेने वाढवल्या प्रेक्षकांच्या अपेक्षा

    दिनांक :06-Dec-2025
Total Views |
मुंबई,
Asha movie ‘बाई अडलीये… म्हणूनच ती नडलीये’ या प्रभावी टॅगलाईनसह काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘आशा’ चित्रपटाच्या टीझरने प्रेक्षकांमध्ये आधीच उत्सुकता निर्माण केली होती. सायकलवरून गावोगाव पोहोचणाऱ्या आशा सेविकेची झलक दाखवणाऱ्या या टीझरने चित्रपटाच्या आशयाबद्दल कुतूहल वाढवले. त्यात भर पडली ती नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘चालत रहा पुढे’ या प्रेरणादायी गाण्यामुळे. आशाच्या संघर्षाला नवी ऊर्जा देणाऱ्या या गाण्याला सोशल मीडियावर प्रचंड प्रतिसाद मिळत असून, प्रेक्षकांनी तिच्या जिद्दीची मुक्तपणे प्रशंसा केली आहे. आता चित्रपटाचा दमदार ट्रेलर प्रदर्शित झाल्याने ही उत्सुकता आणखी वाढत आहे.
 

Asha movie 
ट्रेलर लाँच सोहळा आयुष्यमान भारत – मिशन महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष डॉ. ओमप्रकाश शेटे, 99 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील, लोढा फाउंडेशनच्या अध्यक्षा मंजू मंगलप्रभात लोढा यांच्यासह अनेक मान्यवर आणि आशा सेविकांच्या उपस्थितीत पार पडला. या कार्यक्रमात महिलांच्या संघर्षाला मध्यवर्ती ठेवणाऱ्या ‘आशा’च्या कथानकाबाबत अधिक उत्सुकता निर्माण झाली.
 
 
चित्रपटाचा ट्रेलर Asha movie रिंकू राजगुरू साकारत असलेल्या आशाच्या बहुआयामी प्रवासाची झलक दाखवतो. गावोगावी लोकांच्या आरोग्याची जबाबदारी पार पाडताना तिला भेडसावणारे प्रश्न, कुटुंबीयांमधील ताणतणाव, समाजातील अन्यायाला न घाबरता दिलेला प्रतिकार आणि स्वतःच्या ध्येयाप्रती असलेली न थांबणारी धडपड याचे प्रभावी चित्रण ट्रेलरमध्ये दिसते. तिच्या आयुष्यातील वेदना, धग, तळमळ आणि त्या सगळ्यावर मात करण्याची जिद्द यामुळे ही भूमिका प्रेक्षकांच्या मनाला भिडते.रिंकू राजगुरूसह सायंकित कामत, उषा नाईक, शुभांगी भुजबळ, सुहास शिरसाट, दिशा दानडे, दिलीप घारे आणि हर्षा गुप्ते यांच्या भूमिका चित्रपटाला आणखी उंची देणार आहेत. सामाजिक वास्तवाचा ठसा उमटवणारा हा चित्रपट महिलांना भेडसावणाऱ्या भावनिक तणावांपासून समाजातील अन्यायापर्यंतच्या विविध पैलूंना प्रभावीपणे हाताळतो. ‘आशा’ ही केवळ एका सेविकेची कथा नसून रोजच्या जीवनात लढणाऱ्या लाखो भारतीय महिलांचे प्रतिनिधित्व करणारी कहाणी आहे, हे ट्रेलर स्पष्टपणे जाणवून देतो.
 
 
दिग्दर्शक दिपक Asha movie पाटील म्हणाले, “‘आशा’ हा केवळ एका आरोग्य सेविकेचा प्रवास नाही; ती त्या लाखो स्त्रियांची प्रतिमा आहे ज्या रोज स्वतःला झिजवत इतरांसाठी जगतात. त्यांच्या संघर्षांना आणि सत्याला आवाज देण्याचा आमचा प्रयत्न आहे.”कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक, निलेश कुवर, दैवता पाटील आणि दिपक पाटील यांनी निर्मित केलेला हा चित्रपट मुरलीधर चटवानी आणि रवींद्र औटी यांच्या सहनिर्मितीत साकारला आहे. पॅनोरमा स्टुडिओजच्या माध्यमातून प्रदर्शित होणारा ‘आशा’ वास्तववादी मांडणी आणि नाविन्यपूर्ण कथनशैलीसह प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.‘आशा’ हा चित्रपट येत्या 19 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार असून, टीझर, गाणे आणि ट्रेलरमुळे आधीच निर्माण झालेल्या उत्सुकतेच्या पार्श्वभूमीवर हा चित्रपट प्रेक्षकांसाठी एक भावस्पर्शी, प्रेरणादायी आणि लक्षवेधी अनुभव ठरण्याची शक्यता आहे.