वर्धा,
Datta Jayanti : स्थानिक त्रिमूर्तीनगर येथील माऊली परिवाराच्या वतीने श्री गुरूदत्त उद्यान गुल्हाने ले आउट परिसरात दत्त जयंतीचे औचित्य साधून सुप्रसिद्ध गायक पं. अजित कडकडे यांनी ५ रोजी सायंकाळी सादर केलेल्या भतीगीत, भजन, गौळण अभंग यांचा सुंदर संगम वर्धेकरांनी अनुभवला. कडायाच्या थंडीतही वर्धेकर तो सोहळा अनुभवत होते.

पं. कडकडे यांनी गुरू महाराज गुरु जय जय परब्रह्म सदगुरू हे भजन सादर करून गुरूचरणी सेवा अर्पण केली. त्यानंतर गणपतीला वंदन करून गणपती बाप्पा मोरया मंगलमुर्ती मोरया हे भजन सादर केले. त्यानंतर हळूहळू शंभू भोळा शंकर भोळा हे सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. दत्त जयंती निमित्ताने रसिकाच्या मनावर अधिराज्य करणारे सुप्रसिद्ध संगीतकार प्रवीण दवणे यांनी संगीतबद्ध केलेले निघालो घेऊन दत्ताची पालखी सादर करताना रसिकांनी टाळ्यांचा ठेका दिला. त्यानंतर ढवळ्या ग पवळ्या ग माऊली भेटीला, गण गण गणात बोते म्हणुनी जाऊ या शेगावला हे भजन सादर करून शेगावनगरीच्या वैभवात घेऊन गेले. संत एकनाथांनी संत ज्ञानेश्वरांचं केलेले गुणगान असलेले कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतला चैतन्याचा जिव्हाळा, ध्यान लागले साईनामी हो हे भजन सादर करून रंगत आणली. त्यानंतर स्वामी समर्थ यांना आर्त विनंती करून स्वामी कृपा कधी करणार या भजनातून स्वामी चरणी सेवा अर्पण केली. कैवल्याचा चांदण्याला भुकेला चकोर रे ही भैरवी सादर करून रसिकांची मने जिंकून घेतली. कडायाचा थंडीत वर्धेकर रसिकांची लक्षणीय उपस्थिती होती. यशस्वितेसाठी माऊली परीवार यांनी परिश्रम घेतले.