बुलढाणा/ प्रतिनिधी,
blood-donation : विश्वरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सार्वजनिक जयंती उत्सव समितीतर्फे आयोजित रक्तदान शिबिरात 130 जणांनी रक्तदान करीत अभिवादन केले. शहरातील जयस्तंभ चौकस्थित गांधी भवन प्रांगणात शिबिर व अभिवादन कार्यक्रम पार पडला.
राष्ट्रपिता महात्मा जोतिबा फुले, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती 2025 च्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही सामाजिक बांधिलकी जोपसण्याच्या भावनेतून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी 9 वाजेच्या सुमारास महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरूवात झाली. यानंतर, तरुणांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान करण्यासाठी पुढाकार घेतला. सायंकाळपर्यंत 130 जणांनी रक्तदान केल्याची आकडेवारी प्राप्त आहे.
रक्तसंकलनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय बुलढाणा आणि शेगाव येथील रक्तपेढीसह वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले. जयंतीउत्सव समितीचे अध्यक्ष पत्रकार नीलेश राऊत यांच्या टीमने अथक परिश्रम घेतले. याप्रसंगी आमदार संजय गायकवाड, जालिंधर बुधवत, दत्ता काकस, डी.एस. लहाणे, जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे, जिल्हा शल्य चिकित्सक दत्तात्रय बिराजदार, साहित्यिक सुरेश साबळे, पत्रकार राजेंद्र काळे, सुधाकर अहेर, नितीन शिरसाट, दीपक मोरे, नितीन कानडजे, अभिषेक वरपे यांच्यासह हजारो नागरिकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.