बैलांची शक्ती तारक ठरेल!

    दिनांक :06-Dec-2025
Total Views |
वेध...
electricity generation उदक तारक, उदक मारक । उदक नाना सौख्यदायक । उदकाचा विवेक अलौकिक आहे ।। असे पाण्याच्या नियोजनाचे महत्त्व दासबोधातून समर्थ रामदास स्वामींनी आपल्याला पटवून दिले. अर्थात पाण्याचा सदुपयोग केल्यास त्यापासून तृष्णातृप्ती, शेतीसाठी सिंचन व्यवस्था आणि जलविद्युत निर्मितीही होऊ शकते. मग अश्वशक्तीच्या धर्तीवर बैलांजवळ असलेल्या शक्तीचा सदुपयोग केल्यास आपण टर्बाईन फिरवून वीज निर्मितीही करू शकतो, असा अभिनव प्रयोग देवलापार गो-विज्ञान अनुसंधान केंद्राचे अध्यक्ष पद्मेश गुप्ता आणि डॉ. मनोज तत्त्ववादी यांनी मांडला आहे. खरोखरच हा प्रयोग भविष्यात तारक ठरेल असाच म्हणावा लागेल. आज शेतीत ट्रॅक्टरचा उपयोग वाढल्याने बैल हद्दपार झाले आहेत. परिणामी त्या बैलांना पोसून फायदा काय, असे म्हणत त्यांची रवानगी कत्तलखान्याकडे केली जात आहे. यावर तोडगा म्हणून बैलांच्या शक्तीचा अभिनव उपयोग होऊ शकतो, हे पटवून देण्याची गरज होती. तीच गरज लक्षात घेता गो-विज्ञान अनुसंधान केंद्राने सादर केलेला बैलचलित टर्बाईनद्वारे वीज निर्मितीचा क्रांतिकारी प्रयोग हा ऐतिहासिक आणि चमत्कारिक ठरू शकतो.
 
 

वीज निर्मीती  
 
प्राचीन काळात माणसाने स्वत:च्या प्रगतीसाठी घोड्यांचा उपयोग सुरू केला होता. त्यातूनच अश्वशक्ती उदयास आली. एका मिनिटात 33 हजार पाऊंड वजन 1 फूट उंच उचलण्यास लागणाऱ्या ताकदीला अश्वशक्ती म्हटले जाते. पाळीव घोड्याचा वापर शेकडो वर्षे शेती, प्रवास, मालवाहतुकीसाठी केला गेला. परिणामी घोडा लोकहिताचा ठरला. आता घोड्यांचा वापर कमी झाला असला तरी त्याला कत्तलखान्यात पाठविले जात नाही. दुर्दैवाने यासंदर्भात बैल हा प्राणी बहुउपयोगी असला तरी तो कमनशिबी ठरला. अचानक आधुनिकता आली अन् ट्रॅक्टर घरोघरी झाल्याने बैलांचे महत्त्व संपले. ‘गरज सरो अन् वैद्य मरो’ या युक्तीने चालणाऱ्या समाजाने मग बहुउपयोगी आणि पोळ्याला ज्याची मनोभावे पूजा केली जाते त्या बैलांची रवानगी कत्तलखान्याकडे करण्यास प्रारंभ केला. हा बैलांचा होत असलेला प्रवास मनाला प्रचंड वेदना देणारा असल्याने यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न पद्मेश गुप्ता यांनी करावा, याबद्दल गोधनावर प्रेम करणाऱ्यांनी त्यांचे अभिनंदनच करायला हवे. आता ही संकल्पना यशस्वी व्हावी म्हणून नागपुरातील रामदेव बाबा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजेश पांडे, प्रा. उदय मुजुमदार त्यावर संशोधन करणार आहेत. हे आव्हान फार मोठे असले तरी अशक्य नाही. याकरिता सहजतेने फिरतील असे टर्बाईन संशोधकांना तयार करावे लागतील. जेव्हा टर्बाईन त्या गतीने फिरेल, तेव्हा त्यातून वीज निर्मिती होईल. विशेष म्हणजे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनाही हा प्रयोग आवडल्याने याला नक्कीच राजाश्रय मिळेल यात शंका नाही. हा प्रयोग यशस्वी ठरल्यास बैलांचे महत्त्व वाढेल. परिणामी त्यांचा जीव वाचेल अन् गोहत्याबंदी कायदा खऱ्या अर्थाने यशस्वी होईल.electricity generation कुठलेही कार्य कायदा बनविल्याने यशस्वी होत नसते. त्यात लोकाश्रयसुद्धा गरजेचा असतो. जेव्हा गोपालकांना बैलांचे महत्त्व पटेल तेव्हाच त्यांची रवानगी कत्तलखान्यातून टर्बाईन फिरविण्याकडे होईल. ‘प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे’ असे सर्वांनाच सांगितले गेले. अगदी असाच प्रयत्न आता बैलांच्या शक्तीचा सदुपयोग करण्यासाठी करावा लागेल. बैलांची शक्ती ही रोज सोन्याची अंडी देणाऱ्या कोंबडीप्रमाणे असल्याची बाब शंभरीसाठी गोधन दलालांच्या हवाली करणाऱ्यांना पटवून द्यावे लागेल. समजा हा प्रयोग यशस्वी ठरल्यास गावागावांत टर्बाईन लागतील आणि ती खेडी वीज निर्मितीत स्वयंपूर्ण होतील. आज अन्न, वस्त्र, निवारा आणि वीज या मानवाच्या मूलभूत गरजा आहेत. यातील एखादी गरज बैलांच्या शक्तीद्वारे पूर्ण झाली तर औष्णिक विजेसाठी कोळसा जाळण्याचे प्रमाण घटेल. यातूनच प्रदूषण घटेल. शेवटी, भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी देवळात गेलेला भक्त प्रथमत: नंदी बैलास स्पर्श करून आशीर्वाद घेतो. नंतरच त्याला भगवान शिवाची प्राप्ती होती. मग देवळात श्रद्धेपोटी आपण दगडाच्या नंदीसमोर नतमस्तक होतो. तीच श्रद्धा प्रत्यक्षात आणत सजीव नंदीला कत्तलखान्यात न पाठविता त्याचा उपयोग टर्बाईन फिरवून वीज निर्मितीसाठी केला तर नक्कीच आपण खरे पुण्यवान ठरू शकतो, नाही का?
 
अनिल फेकरीकर
9881717859