दिल्ली अग्रलेख
fadnavis promising विकासाची जाण आणि त्यासाठी लागणारी दीर्घदृष्टी असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रातील महायुतीच्या सरकारला एक वर्ष पूर्ण झाले आहे. राज्यातील महायुती सरकारच्या वर्षपूर्तीचा अर्थात एका वर्षाचा हा काळ खूप मोठा नसला तरी तो राज्याला विकासाच्या मार्गावर नेणारा आहे आणि त्यामुळेच राज्यातील जनतेला अतिशय समाधान देणारा असा म्हणावा लागेल. देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्री म्हणून हा तसा दुसरा कार्यकाळ. याआधी 2014 ते 2019 या काळात फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाचा आपला पहिला पाच वर्षांचा कार्यकाळ यशस्वीपणे पूर्ण केला. मध्यंतरी बरेच काही घडले. मग, मागील वर्षी पाच डिसेंबरला फडणवीस यांनी हजारो लोकांच्या उपस्थितीत मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. लोकनेता कसा असतो आणि कसा असावा, हे आपल्या कृतीतून फडणवीस यांनी सतत दाखवून दिले. 2019 मध्ये पुन्हा एकदा फडणवीस मुख्यमंत्री होतील, असे सर्वांना वाटत होते. महाराष्ट्रातील मतदारांचा जनादेशही तसाच होता, पण काही अनपेक्षित राजकीय घडामोडींनी राजकारण बदलले.
मुख्यमंत्रिपदापासून फडणवीस यांना दूर राहावे लागले. पण ते हताश आणि निराश झाले नाहीत. विरोधी पक्षनेते म्हणून नवी जबाबदारी पार पाडण्यासाठी फडणवीस सज्ज झाले आणि ती जबाबदारी त्यांनी अतिशय प्रभावीपणे आणि यशस्वीपणे पार पाडली. याचे कारण असे की, फडणवीस ज्या संस्कारातून आले, त्यात सत्ता हे साध्य नाही तर जनतेच्या सेवेचे साधन मानले जाते. त्यामुळे जनतेची सेवा करायला फडणवीसांसारख्या नेत्याला सत्तेची किंवा पदाची गरज नाही. सत्ता असेल तर सत्तेसह आणि सत्ता नसेल तर विरोधी पक्षात बसून जनतेची सेवा करायला फडणवीस यांच्यासारखे सुसंस्कृत नेते एका पायावर तयार असतात हे त्यांनी आतापर्यंत केलेल्या भूमिका सिद्ध करतात. राजकारणात येण्याच्या आधीपासून ते संघाचे स्वयंसेवक आहेत. संघाने देशाला दोन पंतप्रधान दिले. योगायोगाने दोघेही कधीकाळी संघाचे प्रचारक होते. त्यामुळे पंतप्रधान म्हणून त्यांनी देशावर आपला ठसा उमटवला. देशात आतापर्यंत होऊन गेलेल्या इतर पंतप्रधानांचे काम आणि वाजपेयी-मोदी यांचे कार्य यातील फरक स्पष्ट दिसतो. एकात्म मानववादाचे प्रणेते पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या अंत्योदय या संकल्पनेचे वाजपेयी आणि मोदी हे दोघेही पाईक. अंत्योदय म्हणजे समाजातील शेवटच्या माणसाचे कल्याण. वाजपेयी आणि मोदी यांच्या सरकारची वाटचाल याच भूमिकेतून झाली आणि अजूनही सुरू आहे. वाजपेयी आणि मोदी यांना आदर्श मानूनच देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारची महाराष्ट्रातील वाटचाल सुरू आहे आणि अंत्योदय हे त्याचे उद्दिष्ट आहे. त्याचा अनुकूल परिणामही दिसून येत आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या दुसèया कारकीर्दीचा हा टप्पा वाटतो तितका सोपा नव्हता. यात त्यांना अनेक आव्हानांचा आणि अडचणींचा सामना करावा लागला. राजकीय तडजोडीत उपमुख्यमंत्रिपदही स्वीकारावे लागले. जी व्यक्ती आपल्या मंत्रिमंडळात सहकारी होती, तिचे नेतृत्व मुख्यमंत्री म्हणून मान्य करताना, त्या मंत्रिमंडळात त्यांना उपमुख्यमंत्री व्हावे लागले. खरं म्हणजे हे राजकीय अवमूल्यन होते. पण फडणवीस यांनी पक्षाच्या आणि राज्यातील जनतेच्या व्यापक आणि दीर्घकालीन हितासाठी हा कडू घोट पचवला. काही वेळेला राजकारणात माघार घ्यावी लागते, संयम बाळगावा लागतो. तुमच्या राजकीय कल्पना स्पष्ट असतील, आपण राजकारणात कशासाठी आलो, याबद्दल मनात कोणताही संभ्रम नसेल तर अशा घटना दिलेरीने घेता येतात. फडणवीस यांनी तेच केले. ज्या पदावर बसले, ते पद त्यांनी मोठे केले. आता मुख्यमंत्रिपदाच्या दुसèया कार्यकाळात देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा कायापालट सुरू केला आहे. खरं म्हणजे याची सुरुवात त्यांनी आपल्या पहिल्या कार्यकाळातच केली होती. त्यावेळी त्यांनी विकासाची जी बीजे टाकली होती, त्यांचा आता डेरेदार वृक्ष झाला आहे आणि त्याला फळेही येत आहेत. मुख्यमंत्रिपदाची दुसऱ्यांदा शपथ घेतल्यानंतर फडणवीस यांनी बदल्याचे नाही तर बदलाचे राजकारण करण्याचा शब्द दिला होता. त्या शब्दाची पूर्तता त्यांनी केली. सर्वच क्षेत्रांत महाराष्ट्रात आज जे बदल दिसून येत आहेत, त्याचे श्रेय त्यांना द्यावे लागेल. मुख्यमंत्रिपदाची शपथ घेल्यानंतर फडणवीस यांनी राज्याच्या मागास, अतिमागास भागाकडे विशेष लक्ष दिले. गडचिरोलीसारख्या नक्षलग्रस्त जिल्ह्याचे पालकमंत्रिपद स्वीकारले. या जिल्ह्याचे पालकमंत्री व्हायला अनेक नेते घाबरत होते, जबरदस्तीने पालकमंत्रिपद आले तर त्या जिल्ह्यात फिरकत नव्हते, चुकून जायची वेळ आली तर गडचिरोलीच्या बाहेर पडत नव्हते. पण ही परिस्थिती फडणवीस यांनी बदलली. गडचिरोलीचा विकास करायचा असेल तर त्या जिल्ह्यातील नक्षलवाद आटोक्यात आणला पाहिजे, संपवला पाहिजे, याची त्यांना जाणीव होती. त्या दिशेने त्यांनी पावले टाकली. नक्षलवाद संपवण्याच्या मोदी सरकारच्या आक्रमक धोरणाची राज्यात प्रभावीपणे अंमलबजावणी केली. त्यांच्या दिशादर्शी कामामुळे महाराष्ट्रातील विशेषत: गडचिरोलीमधील नक्षलवाद आज शेवटचे आचके देत आहे.fadnavis promising नक्षलवाद्यांना शरण येण्याचे आवाहन करण्यात आले. याचा परिणाम दिसून आला. अनेक कुख्यात नक्षलवाद्यांनी फडणवीस यांच्या उपस्थितीत शस्त्रे खाली ठेवत आत्मसमर्पण केले. ज्यांनी आत्मसमर्पण करण्यास नकार दिला, त्यांना गोळ्या घालण्याचा अधिकार त्यांनी पोलिसांना दिला आहे.
यामुळे गडचिरोलीसारख्या खनिज संपत्तीचे भांडार असलेल्या जिल्ह्यात अनेक मोठे उद्योग आले आणि अजून येत आहेत. यातून आदिवासी तरुणांच्या हाताला बंदुका नाही तर रोजगार मिळाला. कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीत महाराष्ट्र राज्य आधीपासूनच आघाडीवर होते. ती आघाडी कायम आहे. राज्याचा जो औद्योगिक विकास झाला, त्यामागे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था स्थिती हे एक कारण होते. आरोग्य आणि शिक्षण यात महाराष्ट्र तर देशात आधीपासूनच आघाडीवरचे राज्य होते. फडणवीस यांच्या कार्यकाळात महाराष्ट्रात विक्रमी परकीय गुंतवणूक आली. यातून महाराष्ट्रात अनेक मोठ्या औद्योगिक समूहांचे उद्योग आले. त्यातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण झाले. तरुणांच्या हाताला काम मिळाले तर त्यांच्या हातात दगड आणि डोक्यात हिंसक विचार येत नाहीत.
फडणवीस यांच्या कार्यकाळात राज्यातील भ्रष्टाचार कमी झाला. मंत्र्यांना त्यांनी कामाला लावले. मंत्र्यांना आणि मंत्रालयांनाही लक्ष्य ठरवून दिले. एवढ्या दिवसांत एवढी कामे झाली पाहिजेत, असे बंधन घालून दिले. यातून मंत्र्यांसोबत प्रशासनातही जनतेप्रति उत्तरदायित्वाची भावना निर्माण केली. काँग्रेसच्या कार्यकाळात केंद्रापासून राज्यापर्यंतचे अनेक मंत्री जनतेला नाही तर काही मूठभर भांडवलदारांना उत्तरदायी राहात होते. त्यातून राज्यात अनागोंदी आणि भ्रष्टाचार वाढला होता. या सर्वांना फडणवीस यांनी आळा घातला. ‘न खाउंगा न खाने दूंगा’, या मोदींच्या पावलावर पाऊल टाकत फडणवीस यांची वाटचाल सुरू आहे, असे म्हटले तर ते चूक ठरू नये. मुख्यमंत्रिपदाच्या पहिल्या कार्यकाळात सुरुवातीला देवेंद्र फडणवीस काहीसे नवखे होते. त्यामुळे प्रशासनावर पाहिजे तशी पकड बसवायला त्यांना वेळ लागला. आता मात्र प्रशासनरूपी नाठाळ घोड्याला फडणवीस यांनी वठणीवर आणले आहे. प्रशासनरूपी घोड्यावर त्यांची मांड पक्की बसली आहे. आता प्रशासन त्यांची फसवणूक करू शकत नाही, त्यांना चुकीचा सल्ला देऊ शकत नाही.
फडणवीस उच्चशिक्षित आहेतच; शिवाय जनमानसावर त्यांची पकड आहे. भविष्यातील दमदार नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. त्यांनी महाराष्ट्र सर्व क्षेत्रांत पुढे जावा यासाठी काम केले व करीत आहेत. महाराष्ट्राच्या या घोडदौडीचे कारण फडणवीस यांच्या नेतृत्वात, कर्तृत्वात आणि वक्तृत्वात आहे.fadnavis promising त्यामुळेच राजकारणात लंबी रेस का घोडा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. देवेंद्र फडणवीसांसारखा नेता महाराष्ट्राला मुख्यमंत्री म्हणून मिळाला, हे महाराष्ट्राचे भाग्य म्हटले पाहिजे. त्यामुळे महाराष्ट्राचा भाग्यविधाता म्हणूनही त्यांचा उल्लेख करायला हरकत नाही. त्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कारकीर्दीसाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी अनंत शुभेच्छा!