भारताची परराष्ट्र नीती इतरांना खूश करणारी नाही!

जयशंकरांचा अमेरिकेला ठाम संदेश

    दिनांक :06-Dec-2025
Total Views |
नवी दिल्ली,
Jaishankar's strong message to America रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या दोन दिवसीय भारत भेटीने आंतरराष्ट्रीय राजकीय वातावरण पुन्हा तापवले आहे. या भेटीत भारत–रशिया दरम्यान अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर सहमती झाली. मात्र, पुतिन यांच्या उपस्थितीमुळे अमेरिका—विशेषतः डोनाल्ड ट्रम्प भारताबद्दल नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की भारताचे रशियाशी असलेले संबंध कोणताही देश व्हेटो करू शकत नाही, हा भारताचा स्वतःचा निर्णय आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत जयशंकर यांनी पाश्चात्य माध्यमांनी पुतिन यांच्याबद्दल केलेल्या मूल्यांकनाकडे दुर्लक्ष करण्याची गरज असल्याचे सांगितले. त्यांनी ठामपणे नमूद केले की भारताची परराष्ट्र नीती इतरांना खूश करणारी नसून, देशाच्या हितांसाठी उभी राहणारी आहे.

jaishankar 
जयशंकर पुढे म्हणाले की, “गेल्या ७० ते ८० वर्षांत जागतिक राजकारणाने अनेक उतार–चढाव पाहिले आहेत, पण भारत–रशिया मैत्री ही जगातील सर्वात स्थिर आणि मजबूत संबंधांपैकी एक आहे.” त्यांनी हेही अधोरेखित केले की रशियाचे चीन, युरोप किंवा अन्य देशांशी असलेले संबंध वेळोवेळी बदलले, तसेच भारताचे इतर राष्ट्रांशी असलेले समीकरणदेखील बदलत गेले, परंतु भारत–रशिया संबंधांची मूळ बांधणी कायम टिकून राहिली.
 
 
अमेरिकेसोबतचे संबंध बिघडतील का, असा प्रश्न विचारल्यावर जयशंकर यांनी स्पष्ट केले की दुसऱ्या देशाशी असलेल्या भारताच्या संबंधांवर कुणीही व्हेटो लावू शकत नाही. ते म्हणाले की भारत आणि अमेरिकेदरम्यान संवादात कोणतीही कमतरता नाही आणि व्यापारी करार देखील लवकरच अंतिम रूप धारण करेल. पुतिन यांच्या भेटीनंतर निर्माण झालेल्या आंतरराष्ट्रीय चर्चांमध्ये भारताने आपली भूमिका स्पष्ट करत, दोन्ही महाशक्तींशी संतुलित संबंध राखण्याचा निर्धार पुन्हा एकदा अधोरेखित केला आहे.