kumbh mela पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा बांधण्याची समाजकंटकांची जुनी रीत आहे. नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याबाबत सध्या सोशल मीडियावर बराच वादंग उठला आहे. साधू-संतांवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत, कुंभ मेळ्याला ‘अंधश्रद्धेचा मेळा’ म्हणून हिणवले जात आहे आणि सर्वांत जास्त चर्चा आहे ती तपोवनातील काही झाडे तोडली जाणार असल्याच्या बातमीची. किती झाडे तोडली जाणार आहेत? अनावश्यक झाडे तोडली जाणार आहेत का? की पुनर्लागवड केली जाणार आहे? हे जाणून न घेता सरसकट टीका होत आहे. नाशिक महानगरपालिकेने तपोवन परिसरात साधुग्रामसाठी झाडे तोडण्याचा प्रस्ताव मांडला आहे. काही माध्यमांनी आणि पर्यावरणवाद्यांनी असा प्रचार केला की ‘‘साधूंच्या तंबूसाठी हजारो झाडे तोडली जाणार आहेत’’. राजकीय विरोधकांनीही यावर तीव्र विरोध केला आहे.
चिपको चळवळी स्टाईल आंदोलने करण्याचा प्रयत्न होत आहे. प्रत्यक्षात महाराष्ट्र सरकारने स्पष्ट केले आहे की एकही अनावश्यक झाड तोडले जाणार नाही. सरकारतर्फे असे सांगण्यात आले आहे की फक्त धोकादायक किंवा परकीय झाडे हटवली जातील आणि त्याऐवजी 1 लाख हून अधिक नवीन झाडे लावली जातील. नाशिकमध्ये ‘क्लीन गोदावरी’ मोहीम सुरू आहे आणि ‘ग्रीन कुंभ’ म्हणून पर्यावरणाचे रक्षण करण्यावर भर आहे. पण ‘‘साधूंसाठी झाडे तोडली’’ हे नॅरेटिव्ह सोयीस्कररीत्या पसरवले गेले आहे. सामान्य लोकही यास भुलत आहेत हे दुर्दैव. यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या. सरकारवर टीका, रोष असणे, हे समजण्यासारखे आहे. जगभरात पर्यावरणप्रेमी आणि सरकारचा संघर्ष होतच राहतो आणि होत राहील. मात्र या आडून हिंदू साधू संतांवर, हिंदू परंपरेवर टीका सुरू झाली आहे. हा रोख आपण ओळखला पाहिजे. प्रयागराज येथील कुंभमेळ्याबाबतही आपल्या परंपरांवर टीका झाली होती. तिथे येणाऱ्या सांधूंसाठीही गलिच्छ भाषा वापरली गेली होती. कुंभ हा हिंदू संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. हजारो वर्षांची परंपरा आहे. अमृतमंथनावेळी चार ठिकाणी अमृताचे थेंब पडल्याची कथा आहे. त्याच ठिकाणी दर 12 वर्षांनी कुंभमेळा होतो. नाशिकमध्ये हा मेळा गोदावरी नदीच्या काठावर साजरा होतो. प्रयागराज येथील कुंभमेळ्यावर आपल्याकडचे महामूर्ख लोक टीका करत बसले होते आणि पवित्र स्नान करण्यासाठी जगभरातील बडे लोक, उद्योगपती आले आणि हिंदू संस्कृतीसमोर नतमस्तक झाले होते. हिंदू विरोधी इको-सिस्टिमचा डाव आपण ओळखला पाहिजे. सर्वसामान्य हिंदूंनी भाजपा या पक्षाला विरोध म्हणून किंवा नावडते सरकार म्हणून कुंभमेळ्यावर व हिंदू साधू संतांना नावे ठेवू नये.
दुसरी गोष्ट हिंदू सण, समारंभ, लग्न सोहळे, उत्सव यांत धार्मिक महत्त्व असतेच. पण त्यातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असते. 2025 मध्ये सुमारे 40 ते 45 कोटी लोकांनी महाकुंभाला भेट दिली आहे. 2019 मध्ये 24 कोटी लोक जमले होते. हे कोट्यवधी लोक मूर्ख आहेत म्हणून इथे येतात का? ज्यावेळी कोट्यवधी लोक एका ठिकाणी 4-5 महिन्यांसाठी येतात, तेव्हा तिथे रोजगाराचा एक प्रचंड महासागर तयार होतो. नाशिक कुंभासाठी देखील अशीच जय्यत तयारी सुरू आहे. कुंभमेळा म्हणजे जणू तात्पुरते आर्थिक शहरच! हे शहर चालवण्यासाठी लाखो लोकांना काम मिळते. प्रयागराज येथील 2025 च्या महाकुंभामध्ये 2 लाख कोटींची आर्थिक उलाढाल झाली. 2013 मध्ये 12 हजार कोटी, 2019 मध्ये 1.2 लाख कोटींची आर्थिक उलाढाल झाली. प्रत्येक मेळ्यात लाखो भाविकांना सुविधा देण्यासाठी हजारो तात्पुरते कामगार पायाभूत सुविधा उभारतात. रस्ते, तंबू, प्रकाशयोजना, पाणीपुरवठा, स्वच्छतागृहे, सुरक्षा आणि आपत्कालीन सेवांचे जाळे उभे करण्यासाठी मोठी कामगिरी पार पाडली जाते. या सर्वांमध्ये मजूर, कारागीर, इलेक्ट्रिशियन, ड्रायव्हर्स, तात्पुरते कर्मचारी आणि स्वयंसेवकांना सतत रोजगार मिळतो. हॉटेल, ढाबे, गेस्ट हाऊस आणि होमस्टे यांनाही प्रचंड मागणी येत असल्याने स्थानिकांना अतिरिक्त उत्पन्नाचे मार्ग उपलब्ध होतात. धार्मिक साहित्य जसे जपमाळा, रुद्राक्ष, देवांची प्रतिमा, पूजासाहित्य यांच्या विक्रीत अभूतपूर्व वाढ होते. याशिवाय फुलवाले, मिठाई-नाश्ता विक्रेते, कपड्यांचे दुकानदार, हस्तकला विक्रेते, चित्रकार, फोटो-व्हिडीओ सेवा देणारे छोटे उद्योजक यांचा व्यवसाय काही आठवड्यांमध्ये वर्षभराचे उत्पन्न मिळवून देतो. मोठ्या कंपन्याही या गर्दीकडे मार्केटिंगची संधी म्हणून पाहतात. मोबाईल नेटवर्क, पेय पदार्थ, ई-कॉमर्स आणि वित्तीय सेवा देणाऱ्या कंपन्या स्टॉल्स, जाहिराती आणि सेवा केंद्रांद्वारे नवीन ग्राहक मिळवतात. आता तर सोशल मीडियावर रील्स, व्हिडीओ अपलोड करणाऱ्या नाही कुंभ मेळ्यातून चांगले उत्पन्न होऊ लागले आहे. त्यामुळे कुंभ हा फक्त धार्मिक सोहळा नाही. खरं तर याकडे मोठी गुंतवणूक म्हणून पाहायला पाहिजे. अर्थकारणाचा महत्त्वाचा स्रोत म्हणून पाहिले पाहिजे. मेळा संपल्यानंतरही प्रभाव म्हणून पर्यटनाला चालना मिळत राहते.kumbh mela कारण अशा मेळ्यांमुळे ते विशिष्ट शहर अथवा गाव जागतिक पातळीवर अधिक प्रसिद्ध होते. या सर्व गोष्टींचा विचार करता कुंभमेळ्यावर होणारी टीका किती दुर्दैवी आहे. जगातल्या कोणत्या सांस्कृतिक, धार्मिक कार्यात इतकी रोजगारनिर्मिती होते? अहो, आमचे दसरा, दिवाळी हे सण सुद्धा हजारो, लाखो लोकांना रोजगार मिळवून देतात. या नक्षली वृत्तींच्या लोकांना मंदिरातल्या भटजीची जात दिसते. या ढोंगी लोकांमध्ये सत्याचा सामना करण्याची धमक असेल तर मंदिराबाहेर हार विकणाऱ्या नारळ विकणाऱ्या, गळ्यातले दोरे इत्यादी साहित्य विकणाऱ्या लोकांची जात विचारावी. म्हणजे कळेल की एक मंदिर किती तरी जणांचे, कितीतरी विविध जातीच्या लोकांचे घर चालवत असते. बऱ्याचदा हिंदू नसलेले लोकही हिंदू सणांवर, उत्सवांवर जगत असतात. प्रसिद्ध मंदिरांची कथा तर आणखी थोर आहे. झाडाला मिठ्या मारून ढोंग करणाऱ्यामध्ये धमक आहे का असा रोजगार निर्माण करण्याची? लाखो लोकांना आध्यात्मिक अनुभूती देणारा हा मेळा प्रत्यक्षात हजारो लहान-मोठ्या, स्थानिक उद्योजकांना, कारागिरांना, कर्मचाऱ्यांना, रोजंदारीवर जगणाऱ्या गरिबांना जगवणारा रोजगार महामेळा आहे.
लेखक: जयेश शत्रुघ्न मेस्त्री