नाशिक हादरले: तीन अपघातांत चार ठार, महिलांसह १६ वर्षीय मुलाचा बळी

    दिनांक :06-Dec-2025
Total Views |
नाशिक,
Nashik-Road Accident : नाशिक शहरात रस्ते अपघातांचे प्रमाण कमी होण्याचे नाव घेत नाही. वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या चार अपघातांत चार जणांचा मृत्यू झाला असून मृतांमध्ये १६ वर्षीय किशोर आणि दोन महिला दुचाकीस्वारांचा समावेश आहे. नाशिक रोड, उपनगर, सातपूर आणि भद्रकाली पोलिस ठाण्यांमध्ये याबाबत गुन्हे नोंदवले गेले आहेत.
 
 
संग्रहित फोटो
 
 
पहिली घटना नाशिक रोड परिसरात घडली. सोहेल साजिद बागवान (वय १६, गोसावीवाडी, नाशिक रोड) बुधवार, ३ डिसेंबर रोजी विवाहसमारंभासाठी सिन्नरफाटा भागात गेला होता. रात्री साधारण साडेदहा वाजता तो दुचाकीवरून घरी परतत असताना नाशिककडून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या एका वेगवान चारचाकी वाहनाने त्याला समोरून जोरदार धडक दिली. या अपघातात तो गंभीर जखमी झाला. बेशुद्ध अवस्थेत त्याला जयराम रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण मध्यरात्री डॉक्टर मेरी गट्टल यांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणाची चौकशी नाशिक रोड पोलिस ठाण्यातील हवालदार सानप करत आहेत.
 
दुसरी घटना त्र्यंबकरोडवरील संस्कृति हॉटेल परिसरात झाली. सोमनाथ बाबूराव वडगे (वय ३५, बेझे फाटा, त्र्यंबकेश्वर) हे ३० नोव्हेंबरच्या संध्याकाळी रस्ता पार करत होते. त्याच वेळी त्र्यंबकेश्वरच्या दिशेने येणाऱ्या एका वेगवान चारचाकी वाहनाने त्यांना धडक दिली. ते गंभीर जखमी झाल्याने त्यांना सुविधा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, गुरुवार ४ डिसेंबर रोजी उपचारादरम्यान डॉक्टर अखिल चौधरी यांनी त्यांना मृत घोषित केले. सातपूर पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद असून तपास हवालदार सूर्यवंशी करत आहेत.
 
तिसरी घटना नाशिक-पुणे महामार्गावर दत्त मंदिर सिग्नलजवळ झाली. माई नितीन भोसले (वय ५२, बालाजीनगर, जेल रोड) आपल्या मुलासह दुचाकीवरून जात असताना मागून आलेल्या एका वेगवान मालवाहू ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. त्या गंभीर जखमी झाल्याने त्यांना सह्याद्री रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण गुरुवार, ४ डिसेंबर रोजी उपचारादरम्यान डॉक्टर महेश बनसोडे यांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणाची नोंद उपनगर पोलिस ठाण्यात झाली असून तपास हवालदार हिवाळे करत आहेत.