कारंजा लाड,
Nrusinh Saraswati Swami Maharaj, दत्तात्रय प्रभूंचा दुसरा अवतार मानल्या जाणार्या श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजाच्या ७२६ व्या जन्मोत्सवास कारंजा येथील गुरू मंदीरात २२ डिसेंबर पासून प्रारंभ होणार असून, हा उत्सव ४५ दिवस चालणार आहे. २ फेब्रुवारी ला शैलगमन यात्रेने या महोत्सवाची सांगता होणार आहे.
२२ डिसेंबर २०२५ रोजी नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांचा ७२६ वा जन्मोत्सवास सुरुवात होणार आहे. २३ डिसेंबरला कलश स्थापनेनंतर अखंड गुरूचरित्र पारायणाला प्रारंभ होणार आहे. २४ डिसेंबर २०२५ ते २८ जानेवारी २०२६ पर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, देश विदेशातील कलावंत, पुरुष भजनी मंडळ, महिला भजनी मंडळ या उत्सवात सहभागी होऊन श्री चरणी आपली सेवा देणार आहेत. किर्तनकार हभप सुशीलबुवा देशपांडे कारंजा, हभप राजेंद्रबुवा मांडेवाल मुंबई, हभप अविनाशबुवा परळीकर कारंजा, हभप शरदबुवा घाग नृसिंहवाडी, हभप प्रज्ञा देशपांडे पुणे, हभप दिगंबरबुवा नाईक नागपूर, हभप कौस्तुबबुवा परांजपे पुणे, हभप अंजली पिंजरकर कारंजा, हभप संगीता गलांडे नागपूर, अश्विनी सस्तकर कारंजा आपले किर्तनाची सेवा देणार आहेत तसेच अजित कडकडे, प्रथमेश लघाटे, मुग्धा लघाटे वैश्यंपायन, पं.कृष्णेन्द्र वार्डीकर हुबळी, पं.भुवनेश कोमकली देवास, हेमांगी नेने हैद्राबाद यांचे गायन अनेक प्रवचनकारांचे प्रवचन, आरोग्य शिबिर, नेत्र तपासणी, भक्तिसंगीत इत्यादी कार्यक्रम संपन्न होणार आहेत.
२९ जानेवारीला रुद्र स्वाहाकार व शतचंडी स्वाहाकार यज्ञास सुरुवात, ३० जानेवारीला आर्ट ऑफ लिव्हिंग परिवाराचा सतसंग, ३१ जानेवारीला श्री वसंतपुजा, १ फेब्रुवारीला श्रींची पालखी सोहळा, २ फेब्रुवारीला यज्ञ पुर्णाहुती, महाप्रसाद व संध्याकाळी श्री शैलगमन शोभायात्रा श्रींच्या पालखीची शहरातील मुख्य मार्गावरुन परिक्रमण करीत ३ फेब्रुवारीला सकाळ पर्यंत मंदिरात पोहोचल्यानंतर जन्मोत्सवाची सांगता होईल. जन्मोत्सवानिमित्त मंदिराला आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात येते. या जन्मोत्सव सोहळ्याची पुर्वतयारी व उत्सव कालावधीतील विविध कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडावे याकरीता श्री गुरूमंदीर संस्थान उत्सव समितीच्या वतीने चांगले नियोजन करण्यात आले आहे. आयोजित केलेल्या धार्मिक कार्यक्रमांचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन गुरुमंदिर संस्थान विश्वस्तांच्या वतीने करण्यात आले आहे.