तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
state-drama-competition : चंद्रपूर केंद्रावर नुकत्याच पार पडलेल्या 64 व्या मराठी राज्य नाट्य स्पर्धेचे सांस्कृतिक सचालनालय मुंबईद्वारा निकाल जाहीर करण्यात आले असून कलासाधना बहुउद्देशीय संस्था यवतमाळ या संस्थेने स्पर्धेत दोन बक्षिसे पटकावत सुयश प्राप्त केले आहे.
मराठी रंगभूमीवरील पुरोगामी विचार प्रवर्तक नाटकांतील एक अशा अभिराम भडकमकर लिखीत ‘देहभान’ या नाटकाचे उत्तम सादरीकरणाद्वारे संस्थेने या नाटकाला प्रेक्षक आणि समीक्षकांची प्रशस्ती केलीच. या नाटकातील प्रमुख आणि अत्यंत आव्हानात्मक अशा स्त्रीभूमिकेसाठी प्रिया कांडूरवार यांना उत्तम अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्र मिळाले. तर यवतमाळातील रंगभूषाकार शैला सज्जनवार यांनी या नाटकातील पन्नास वर्षांच्या दोन कालखंडांचा फरक दर्शवून केलेल्या कलावंतांच्या रंगभूषेकरिता द्वितीय पुरस्कार प्राप्त केला. दोन पुरस्कार पटकावत संस्थेच्या शिरपेचात त्यांनी मानाचा तुरा खोवला आहे.
या नाटकाचे दिग्दर्शन राजन टोंगो आणि अनिकेत बेगडे यांनी केले होते. नेपथ्य सतीश पवार, प्रकाश योजना अभिषेक श्रीकुंडावार, वेशभूषा ऐश्वर्या बेगडे आणि संगीत संयोजन तथा थेट संगीत शीतल बोंद्रे आणि अपर्णा शेलार यांनी केले होते. यातील इतर भूमिकांत राजन टोंगो, शिल्पा बेगडे, श्रेयश गुल्हाने, अनिकेत बेगडे, शांभवी पांडे व प्रा. ज्ञानेश्वर गटकर होते. नाट्यप्रयोगाची रंगमंचव्यवस्था सरला इंगळे, दिलीप इंगळे, बाळासाहेब सज्जनवार, सतीश राठोड यांनी सांभाळली होती.