चंद्रपूर,
Pune-Mumbai daily train demand, पुणे-मुंबई साठी दैनंदिन रेल्वे गाडी सुरू करण्याच्या प्रमुख मागणीसाठी चंद्रपूर रेल प्रवासी सेवा संस्थेकडून येथील न्यायालयासमोर शनिवारपासून उपोषण आंदोलनाला सुरूवात झाली आहे.
या परिसरातील जनतेला पुण्या-मुंबईला जाण्यासाठी दैनंदिन रेल्वेगाडी नाही. त्यामुळे प्रवासात होणारा त्रास लक्षात घेता काही दिवसांपासून रेल्वे प्रशासनाविरुध्द समाजमाध्यमांवर जनक्षोभ वाढला होता. त्याची दखल घेत, शनिवार 6 डिसेंबरला रोजी सकाळी 11 वाजेपासून येथील न्यायालयासमोर तीन दिवसीय उपोषणाला सुरूवात करण्यात आली असून, पहिल्या दिवशी संस्थेचे पदाधिकारी पुनम तिवारी, रमेश बोथरा, डॉ. मिलींद दाभेरे, प्रल्हाद शर्मा, अनिश दीक्षित उपोषणाला बसले होते. त्यांचे उपोषण सायंकाळी 6 वाजता सुटले. तर रविवारी नवे सदस्य उपोषण करणार आहेत. तीन दिवस चालणारे हे सांकेतिक उपोषण आंदोलन आहे. तरीही मागणी मान्य झाली नाही, तर अधिक तीव्र आंदोलन करण्यात येईल, अशी घोषणा संस्थेचे कार्याध्यक्ष दामोधर मंत्री यांनी केली आहे.
गेल्या दोन Pune-Mumbai daily train demand, महिन्यांपासून समाजमाध्यमांवर रेल्वे गाड्यांच्या मागणीवरून प्रचंड रोष व्यक्त होत होता. त्यामुळे चंद्रपूर रेल प्रवासी सेवा संस्था पुढे सरसावली आणि संस्थेच्या सदस्यांनी जिल्ह्यातील सर्व राजकीय नेते, रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी यांना निवेदन दिले. मात्र, तरीही काहीच झाले नसल्याने अखेर उपोषण आरंभले गेले. चंद्रपूर ते मुंबई व चंद्रपूर ते पुणे जलद रेल्वे गाडी दररोज भुसावल मार्ग सुरू करण्यात यावी, चंद्रपूर ते कोलकता जलद रेल्वे गाडी व चंद्रपूर ते नागपूर इंटरसीटी रेल्वे गाडी दररोज सुरू करावी. तसेच चंद्रपूर रेल्वे स्थानकावर सर्व रेल्वे गाड्यांना थांबा देण्यात यावा आदी मागण्यांकरिता हे उपोषण केले जात आहे. या मागण्यांचे निवेदन संस्थेच्या वतीने मध्य रेल्वेचे मंडल रेल प्रबंधक विनायक गर्ग यांना सादर करण्यात आले आहे. मात्र, या मागण्यासंदर्भात रेल्वेकडून कुठलाही प्रतिसाद मिळालेला नाही.दरम्यान, चंद्रपूरच्या शैक्षणिक व सामाजिक संस्थांच्या पदाधिकारी, विद्यार्थ्यांनी उपोषण मंडपाला भेट देऊन या आंदोलनाला पाठींबा जाहीर केला आहे