धक्कादायक! जिल्हा रुग्णालयात उंदरांनी बनवले मृतदेहाला अन्न

    दिनांक :06-Dec-2025
Total Views |
हरिद्वार,
haridwar-district-hospital : हरिद्वारच्या जिल्हा रुग्णालयातून समोर आलेल्या धक्कादायक प्रकरणाने सर्वत्र संताप उसळला आहे. शवविच्छेदनासाठी ठेवलेला मृतदेह उंदरांनी चावल्याचे आढळले. हा प्रकार कळताच मृत तरुणाच्या कुटुंबीयांनी आणि स्थानिक नागरिकांनी रुग्णालयात गोंधळ घातला, धरणे आंदोलन केले आणि रुग्णालयातील काही भागाची तोडफोडही केली.
 
 

संग्रहित फोटो
 
 
मृत लकी शर्मा हे ज्वालापूरचे रहिवासी होते. त्यांचे रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. त्यानंतर त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. दुसऱ्या दिवशी सकाळी शवविच्छेदन करण्याची तयारी सुरू असताना मृतदेह उंदरांनी चावल्याचे निदर्शनास आले. विशेषतः मृतदेहाचे डोळे आणि डोक्याचा काही भाग कुरतडलेला होता. हे पाहताच कुटुंबीय संतप्त झाले आणि त्यांनी रुग्णालय प्रशासनाच्या निष्काळजीपणावर तीव्र आरोप केले.
 
 
 
स्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच प्रशासकीय अधिकारी तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि परिस्थिती आटोक्यात आणली. नातेवाईकांनी जबाबदार कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. प्रकरण गंभीर असल्याने काँग्रेस पक्षाचे प्रतिनिधीही रुग्णालयात पोहोचले आणि निष्काळजीपणाविरोधात कार्यवाहीची मागणी करत त्यांनीही धरणे आंदोलन केले.
 
 
 
मुख्य वैद्यकीय अधीक्षक आर. व्ही. सिंह यांनी या प्रकरणाची पुष्टी केली. त्यांनी सांगितले की हा उंदरांच्या उपद्रवाचा प्रकार असू शकतो, मात्र इतर शक्यताही नाकारता येत नाहीत. या घटनेची सखोल चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली असून, तपास सुरू आहे.