स्मरणशक्ती घेऊनच जन्माला आलो

    दिनांक :06-Dec-2025
Total Views |
मुंबई
Sachin Pilgaonkar मराठी सिनेसृष्टीत बालकलाकार म्हणून पदार्पण करून सहा दशकांहून अधिक काळ अभिनयक्षेत्रात सतत सक्रिय राहिलेल्या सचिन पिळगावकरांनी अलीकडच्या मुलाखतीत स्वतःच्या स्मरणशक्तीबद्दल खुलून बोलत एका जुन्या आठवणीचा किस्सा रंगवला. त्यांच्यासोबत मुलाखतीत उपस्थित असलेल्या लेक श्रिया पिळगावकरची प्रतिक्रिया मात्र सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे.
 

Sachin Pilgaonkar  
सचिन पिळगावकरांना “तुम्हाला इतक्या सगळ्या गोष्टी कशा काय लक्षात राहतात?” असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना ते म्हणाले की, जणू ते स्मरणशक्ती घेऊनच जन्माला आले आहेत. “माझी बुद्धी तल्लख आहे, पण ते नेहमीच चांगलं असतं असं नाही. कारण सगळ्याच गोष्टी लक्षात राहतात. मी सहज माफ करू शकतो, पण कधीच काही विसरू शकत नाही. त्यामुळे त्रासही होतो. मात्र त्याचे फायदेही आहेत; क्षुल्लक वाटणाऱ्या अनेक गोष्टी योग्य वेळी आठवतात,” असे त्यांनी स्पष्ट केले.
सचिन पिळगावकरांनी आपल्या कारकिर्दीत ‘अशी ही बनवाबनवी’, ‘नवरा माझा नवसाचा’, ‘गंमत जंमत’ यांसारखे अनेक गाजलेले मराठी चित्रपट आणि ‘नादिया के पार’, ‘अखियों के झरोखों से’, ‘शोले’सारखे हिंदी चित्रपट गाजवले आहेत. अभिनयासोबतच दिग्दर्शन, गायन, निर्मिती अशा विविध क्षेत्रांत त्यांनी बहुआयामी योगदान दिले आहे.दरम्यान, ‘Mashable India’ला दिलेल्या आणखी एका मुलाखतीत त्यांनी बालपणीच्या आठवणींमधील खास किस्सा सांगितला. आपल्या आयुष्यातील पहिली गाडी त्यांनी अवघ्या नऊ वर्षांच्या वयात विकत घेतल्याचे सचिन यांनी सांगितले. “तेव्हा हा सी-लिंक नव्हता. मी टायकलवाडीत राहायचो. त्या वेळी मी ‘मॉरिस माइनर बेबी हिंदुस्थान’ नावाची गाडी घेतली. बकेट सीट, फ्लोअर शिफ्ट गिअर असलेली पेट्रोल गाडी होती,” असे त्यांनी आठवले.“ड्रायव्हर होता, पण मीही वरळी सीफेसवर ती गाडी चालवायला शिकलेलो होतो,” असे त्यांनी हसत सांगितले. नऊ वर्षांच्या मुलाने गाडी विकत घेणे आणि चालवायला शिकणे हे ऐकून मुलाखतकारासह श्रिया पिळगावकरलाही प्रचंड आश्चर्य वाटले. हा खुलासा ऐकताच श्रियाला हसू आवरेना आणि ती ऑन कॅमेऱ्यावरच फिदीफिदी हसली. तिची ही प्रतिक्रिया सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे.
सचिन पिळगावकरांच्या स्मरणशक्तीवरील भाष्य आणि बालपणीच्या आठवणींनी सजलेला हा किस्सा पुन्हा एकदा चाहत्यांना त्यांच्या बहुमुखी व्यक्तिमत्त्वाची झलक दाखवून गेला.