मालेगाव,
Shirpur, special gram sabha समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत थकीत करांवर ५० टक्के सवलत देण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयाची अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी शिरपूर येथे विशेष ग्रामसभा आयोजित करावी, अशी मागणी गणेश निवत्ती अंभोरे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी गटविकास अधिकार्यांना निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, ग्रामपंचायतीचे पाणीपुरवठा कर व सर्वसाधारण कर मोठ्या प्रमाणात थकीत आहेत. त्यामुळे सामान्य फंडात निधीअभावी मूलभूत सुविधा पुरवणे, विकासकामे राबवणे आणि कर्मचार्यांना वेळेवर वेतन देणे कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत राज्य शासनाने थकीत करांवर ५० टक्के सवलत देऊन नागरिकांना आर्थिक दिलासा दिला असून, ग्रामपंचायतींच्या निधीवाढीसही चालना मिळाली आहे. त्यामुळे या योजनेबाबत ग्रामस्थांना माहिती देण्यासाठी आणि जनजागृतीसाठी विशेष ग्रामसभा घेणे अत्यावश्यक असल्याचे निवेदनात म्हटले आहे. कर वसुलीत वाढ झाल्यास ग्रामविकासाची गती वाढेल, म्हणून ही योजना शिरपूर ग्रामपंचायतीसाठी महत्त्वाची संधी असल्याचे ग्रामस्थांनी नमूद केले आहे. अंभोरे यांच्यासह दिलेल्या निवेदनावर नागरिकांनी स्वाक्षर्या केल्या असून, प्रशासनाने तातडीने विशेष ग्रामसभा बोलवावी, अशी मागणी करण्यात आली आहे.