स्वछतेबाबत कठोर नियमावली : दररोज 150 रुपये दंड

‘कचरा फक्त घंटागाडीतच टाकावा अन्यत्र टाकू नये’

    दिनांक :06-Dec-2025
Total Views |
तभा वृत्तसेवा
दारव्हा,
strict-regulations-regarding-cleanliness : शहरातील वाढत्या अस्वच्छतेचा प्रश्न लक्षात घेता नगरपरिषद प्रशासनाकडून नागरिकांसाठी स्वच्छतेबाबत कठोर नियमावली लागू करण्यात आली आहे. शहर स्वच्छ आणि निरोगी ठेवण्यासाठी प्रत्येक नागरिकाने जबाबदारीने वागावे, यासाठी रस्त्यावर, नाल्यात किंवा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकण्यावर कडक बंदी घालण्यात आली आहे. कचरा केवळ घंटागाडीतच टाकावा, असे नगरपरिषद प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
 
 
y6Dec-Vitthal-Kedare
 
नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विठ्ठल केदारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील कोणत्याही भागात रस्त्यावर कचरा टाकताना नागरिक आढळल्यास संबंधित नागरिकाकडून प्रतिदिन 150 रुपये इतका दंड आकारण्यात येणार आहे. प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयाचा उद्देश शहरातील स्वच्छतेची पातळी सुधारण्यासाठी नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करणे हा आहे.
 
 
दररोज शहरभर फिरणाèया घंटागाडीमध्येच कचरा टाकावा अशी सूचना नगरपरिषदेकडून करण्यात आली आहे. प्रशासनाने स्पष्ट केले आहे की दंडाची रक्कम वेळेत न भरल्यास संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल. त्यामुळे नागरिकांनी स्वच्छतेच्या नियमांचे पालन करावे, अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल. सार्वजनिक ठिकाणे, रस्ते व नाल्यांमध्ये कचरा टाकल्यामुळे शहरातील स्वच्छता बिघडतेच, शिवाय नागरिकांच्या आरोग्यावरही त्याचा दुष्परिणाम होत असल्याचे मत मुख्याधिकारी विठ्ठल केदार यांनी व्यक्त केले. शहराला स्वच्छठेवण्यासाठी नगरपरिषद प्रशासन प्रयत्नशील आहे आणि या उपक्रमात नागरिकांचे सहकार्य अत्यावश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
‘स्वच्छ दारव्हा, सुंदर दारव्हा’ यासाठी प्रत्येक नागरिकाने जबाबदारीने कचरा घंटागाडीतच टाकावा, असे आवाहन दारव्हा नगर परिषदेचे मुख्याधिकारी विठ्ठल केदारे यांनी केले आहे.