केळझर,
Vitthal festival Kelzar, येथील संत राम काकडे महाराजांच्या पुण्यतिथी सप्ताहानिमित्त श्री संत राम काकडे महाराज संस्थान येथे ३० नोव्हेंबर ते ७ डिसेंबर पर्यंत श्रीमद भागवत कथा तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताहाची सांगता उद्या रविवार ७ रोजी शंभरावर भजनी मंडळांच्या सहभागाने भव्य दिंडी सोहळा तथा महाप्रसादाने होत आहे.
या सप्ताहाच्या प्रारंभी संत राम काकडे महाराजांच्या पादुका घेऊन वर्धा येथील आर्वी नायावरील संत ज्ञानेश्वर मंदिरातून पायी वर्धा ते केळझर दिंडी पुरुषोत्तम महाराज चौधरी, गणेश महाराज तेलरांधे यांच्या संयोजनात केळझरच्या संत राम काकडे महाराज संस्थानमध्ये आगमनाने झाली. ३० नोव्हेंबर ते ७ डिसेंबर पर्यंत विदर्भातील नामवंत कीर्तनकार सोमेश्वर महाराज गौळकर, प्रमोद महाराज ठाकरे, उद्धव महाराज कोतवाल, गोविंद महाराज कानगुले, गजानन महाराज पिंपळे, रमेश महाराज बुधे यांच्या मधुर वाणीतून केळझरकरांनी श्रवण केली.
सप्ताहात दररोज काकडा भजन, दिंडी सोहळा, ज्ञानेश्वरी पारायण, भागवत कथा, हरिपाठ भारूड, हरिकीर्तन असा दैनिक उपक्रम सुरू होता. रविवारी १० ते १२ पर्यंत काल्याचे कीर्तन एकनाथ महाराज गौठकर करतील. दुपारी १२ ते २ पर्यंत दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. दिंडी मार्गात आकर्षक गेट लावणार्या मंडळांना प्रथम २ हजार, व्दितीय १५०० तर तृतीय १ हजार रुपये रोख बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. या सोहळ्यात ग्रामस्थ, भतांनी हजारोच्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन संस्थान तर्फे करण्यात आले आहे.