पराग मगर
नागपूर,
dilip-vyas : भारतासह जगाची भ्रमंती करून तेथील वास्तू व संग्रहालयांना भेट देऊन विश्वाचा इतिहास आणि वैशिष्ट्ये पाहणे कुणालाही आवडेल. परंतु सर्वसामान्यांना ते सहज शक्य हाेत नाही. मात्र सीताबर्डीतील टेकडी लाईन येथील व्यासवाड्यातील दिलीप व्यास यांच्या वस्तु संग्रहालयातून जगाचा शेकडाे वर्षांचा प्रवास घडताे. आजघडीला त्यांच्या संग्रहालयात जगभरातील 1 हजार 235 प्रकारातील तब्बल 30 हजार वस्तू आपला इतिहास सांगत आहेत.
दिलीप व्यास यांचे आजोबा बादूराम व्यास हे मूळचे सिंध प्रांताचे. पण 1947 मध्ये ते फाळणीनंतर राजस्थानमधील जैसलमेर येथे आले. ते राजाकडे राज ज्योतिषी हाेते. पितळ, चांदी, कास्य धातूसह, हस्तीदंत व इतरही प्रकारच्या विविध वस्तू त्यांना त्यावेळी मिळायच्या. याच काळात राजस्थानमध्ये प्रचंड दुष्काळ पडला. नागपुरातील गाेपीकिशन पुराेहित यांच्या संपर्काने ते नागपुरात स्थायिक झाले. मिळालेल्या वस्तू संग्रह करण्याचा त्यांचा छंद त्यांनी येथेही कायम ठेवला. पुढे त्यांचा मुलगा राधाकृष्ण व्यास आणि त्यांचे सुपुत्र दिलीप व्यास यांनी ही परंपरा कायम ठेवत या संग्रहालयात सतत भर घातली. आज या संग्रहालयात भारतासह जपान, स्पेन, रशिया, इंग्लंड, इडली, नेदरलँड यासह जगभरातील 1 हजार 235 प्रकारातील तब्बल 30 हजार वस्तू अतिशय सुस्थितीत आहेत.
काय काय आहे या संग्रहालयात
व्यास यांच्या संग्रहालयात पितळीची विविध भांडी, लँप, स्टाेव्ह, अडकित्ते, बारीक कलाकुसर असलेल्या मूर्ती, करंडे, पायल्या जाते, खेळणी, अॅश ट्रे, यासह ब्रिटिश काळातील क्रॉकरी, विविध प्रकारचे कुलूप, टाइपरायटर, विविध प्रकारचे मॅग्निाईड ग्लास, साेनेरी मुलामा असलेल्या वाईन बॉटल, साेनेरी ताशपत्ते, विविध आकारांचे शार्पनर, हस्तिदंती चाकू यासह विविध वस्तू आहेत. त्या वस्तू पाहून थकावे पण वस्तू संपणार नाही असा हा प्रकार आहे.
आद्य सरसंघचालकांनी दिलेली पँट व तरुण भारतच्या प्रती
व्यास परिवार हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी फार वर्षांपासून जुळलेला आहे. राजस्थानमध्ये आद्य सरसंघचालक डाॅ गेडगेवार हे 1932 मध्ये आले असताना बादुराम यांना त्यांनी संघाचा पोशाख दिला होता. ताे दिलीप व्यास यांनी आजही सांभाळून ठेवला आहे. विशेष म्हणजे तरुण भारतचे जुने अंकही त्यांनी जपून ठेवले आहे.
थोडी जागा मिळावी...
व्यास यांच्या तीन पिढ्यांनी या युनिक वस्तुंचा संग्रह करून त्यात सतत भर टाकली आहे. पदरचे पैसा त्यांनी यासाठी खर्च केला आहे. पण या वस्तू नीट ठेवण्यासाठी जागा अपुरी पडत आहे. हे संचित सांभाळण्यासाठी थाेडी जागा मिळावी ही त्यांची अपेक्षा आहे. तर हा वारसा असाच सांभाळणार असल्याचे त्यांची मुलगी न्यांसी व्यास सांगते.