महाराष्ट्राचे हिवाळी अधिवेशन नागपुरातच का भरते? जाणून घ्या यामागचा इतिहास

    दिनांक :06-Dec-2025
Total Views |
नागपूर,  
winter-session-of-maharashtra महाराष्ट्र विधानमंडळाचे शीतकालीन अधिवेशन ८ ते १४ डिसेंबरदरम्यान नागपुरात पार पडणार असून या सात दिवसीय सत्रात महत्त्वाच्या कायदेविषयक प्रस्तावांपासून ते प्रशासनिक मुद्यांपर्यंत अनेक निर्णायक विषयांवर चर्चा अपेक्षित आहे. नेहमीप्रमाणे एकच प्रश्न पुन्हा उपस्थित झाला आहे—राज्याची राजधानी मुंबई असताना शीतकालीन अधिवेशन दरवर्षी नागपुरातच का भरते? याचे उत्तर राज्याच्या इतिहासात आणि एका महत्त्वपूर्ण करारात दडलेले आहे.
 
winter-session-of-maharashtra
 
नागपूरने ब्रिटिश काळात शतकाहून अधिक काळ — १८५४ ते १९५६ — प्रादेशिक राजधानी म्हणून काम पाहिले. याच काळात राज्याच्या पुनर्रचनेचा प्रश्न ऐरणीवर आला आणि डिसेंबर १९५३ मध्ये फजल अली यांच्या अध्यक्षतेखाली पहिला राज्य पुनर्रचना आयोग स्थापन झाला. महाराष्ट्राच्या निर्मितीचा प्रश्न काँग्रेससह अनेक पक्षांसमोर गुंतागुंतीचा बनला होता. या परिस्थितीत डॉ. एस. एम. जोशी यांनी विविध विरोधी पक्षांना एकत्र आणत संयुक्त महाराष्ट्र परिषद उभी केली आणि राज्यातील नेत्यांनी मिळून तोडगा शोधण्याचा निर्धार केला. यासाठी सप्टेंबर १९५३ मध्ये राज्यातील तिन्ही प्रदेशांतील प्रतिनिधी नागपुरात जमले आणि २८ सप्टेंबरला ऐतिहासिक नागपूर करार झाला. या करारात भाऊसाहेब हिरेंपासून यशवंतराव चव्हाण, पंजाबराव देशमुख, शेषराव वानखेडे, देवीसिंह चव्हाण यांसह विविध भागांचे प्रतिनिधी सहभागी झाले. winter-session-of-maharashtra महाराष्ट्राची रचना, प्रशासकीय विभाग, राजधानी, न्यायालयीन व्यवस्था, सेवांमध्ये भरतीचे प्रमाण अशा अनेक महत्त्वाच्या बाबी या करारातून निश्चित करण्यात आल्या.
या करारानुसार मराठी भाषिक असलेले मुंबई, मध्य प्रदेश आणि हैदराबादमधील प्रदेश एकत्र करून स्वतंत्र महाराष्ट्राची निर्मिती व्हावी आणि राजधानी मुंबई असावी, असे मान्य केले गेले. मात्र, विदर्भाच्या ऐतिहासिक महत्त्वाचा सन्मान राखण्यासाठी एक महत्त्वाची तरतूद करण्यात आली—नव्याने तयार होणाऱ्या संयुक्त महाराष्ट्राचे एक अधिवेशन दरवर्षी नागपुरात भरवणे बंधनकारक असेल. फजल अली आयोगाचा अहवाल १९५५ मध्ये आला आणि १९५६ पासून भाषावार राज्यांचे पुनर्रचनेचे धोरण लागू झाले. या प्रक्रियेत विदर्भाने आपली राजधानीची ओळख गमावली, परंतु नागपुरकरांच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत याची काळजी घेत १९५३ चा करार कायम ठेवण्यात आला. winter-session-of-maharashtra १९६० मध्ये महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आल्यानंतर पहिल्याच वर्षी शीतकालीन अधिवेशन नागपुरात भरले आणि ही परंपरा आजतागायत अबाधित सुरू आहे.
नागपूर अधिवेशन ही केवळ परंपरा नसून राज्याच्या तीनही प्रदेशांना — विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र — समान महत्त्व देण्याच्या राजकीय बांधिलकीचे प्रतीक आहे. राजधानी मुंबई असली तरी नागपूरचा ऐतिहासिक आणि प्रशासकीय वारसा कायम राहावा म्हणून आजही महाराष्ट्र विधानमंडळाचे हिवाळी सत्र नागपूरच्याच दारात भरते.