मुंबई,
Amitabh Bachchan, हिंदी चित्रपटसृष्टीतील दोन सर्वात मोठी नावं—अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान—यांच्या नात्यातील आदर, जिव्हाळा आणि आपुलकीची गोष्ट नेहमीच चर्चेत राहिली आहे. ज्या उंचीवर ‘सदी के महानायक’अमिताभ बच्चन पोहोचले, त्या शिखरावर पोहोचणारे फार थोडे कलाकार आहेत आणि त्यात शाहरुख खानचा समावेश नेहमीच केला जातो. अमिताभ जिथे 56 वर्षांपासून चित्रपटसृष्टीत सक्रिय आहेत, तिथे शाहरुखलाही मोठ्या पडद्यावर 33 वर्षांहून अधिक काळ झाला आहे.
शाहरुखनेAmitabh Bachchan अनेकदा कबूल केले आहे की बच्चन हे त्यांचे रोल मॉडेल आहेत. त्यांच्या चित्रपटांवर वाढत आलेल्या शाहरुखने प्रत्येक मुलाखतीत अमिताभप्रती असलेला प्रेमळ आदर व्यक्त केला आहे. प्रत्येक भेटीत शाहरुख बच्चन यांच्या पायांना स्पर्श करून आशीर्वाद घेतात, आणि अमिताभही त्यांच्याकडे मुलाप्रमाणे पाहतात.याच आत्मीयतेमुळे अमिताभ बच्चन यांनी एकदा शाहरुखला एक महत्त्वपूर्ण सल्ला दिला होता, जो ‘किंग खान’ आजही मनापासून पाळतात. एका मुलाखतीत शाहरुखने ही गोष्ट स्वतः सांगितली होती. त्यांनी म्हटले होते, “अमितजींनी मला एकदा सांगितले होते की, ‘आता तू मोठा स्टार झाला आहेस. त्यामुळे तू काहीही केलेस तरी अनेकदा तुला चुकीचे ठरवले जाईल. म्हणून जर कधी चुकी घडली तर हात जोडून माफी मागायला अजिबात घाबरू नको .’” शाहरुखच्या म्हणण्यानुसार, या साध्या पण प्रभावी शिकवणीने त्यांना आयुष्यभर मार्गदर्शन केले आहे.
दरम्यान, वर्कफ्रंटकडे पाहिले तर अमिताभ बच्चन मोठ्या पडद्याबरोबरच छोट्या पडद्यावरही तितक्याच लोकप्रिय आहेत. सध्या ते ‘कौन बनेगा करोड़पती’च्या 17व्या पर्वाचे सूत्रसंचालन करत आहेत. शाहरुख खानची शेवटची रिलीज ‘डंकी’ (2023) होती, त्यानंतर ते मोठ्या पडद्यावर दिसले नाहीत. मात्र त्यांच्या बहुचर्चित आगामी चित्रपट ‘किंग’ची प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहत आहेत. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित हा दमदार अॅक्शनपट 2026 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.अमिताभ आणि शाहरुख यांचे नाते केवळ दोन सुपरस्टार्समधील नाही, तर दोन पिढ्यांच्या भावनिक जोडणीचे प्रतीक मानले जाते. एकाने दिलेल्या सल्ल्याला दुसऱ्याने आयुष्यभराचे मूल्य बनवले—यातूनच त्यांच्या नात्याची खोली समजून येते.