नागपूर,
winter-session : विरोधी पक्ष नेत्याच्या नियुक्तीबाबत प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. हा प्रस्ताव प्रलंबित असून योग्य वेळी या प्रस्तावावर निर्णय घेण्यात येईल, असे विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांनी रविवारी विधानभवन येथे पत्रपरिषदेत सांगितले. यावेळी उपसभापती डॉ. नीलम गोर्हे या सुध्दा उपस्थित होत्या.
सरकार झाल्यापासून विरोधी पक्ष नेत्याचे पद रिक्त आहे. विरोधी पक्षाच्या नेत्याची नियुक्ती न करताच यापूर्वीचे अधिवेशन झाले आहे. त्यामुळे आता हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्ष नेत्याचा निर्णय होईल का? या प्रश्नावर सभापती राम शिंदे म्हणाले,’ सोमवारी विधीमंडळाच्या अधिवेशनात काय होईल, हे आताच काही सांगता येणार नाही ? विरोधी पक्ष नेत्याची नियुक्ती संवैधानिक प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी ही जागा नाही.
विधानसभेत विरोधी पक्षनेता हा केवळ एका पक्षाचा प्रतिनिधी नसून संपूर्ण विरोधी पक्षांचे नेतृत्व करणारा संवैधानिक दर्जाचा पदाधिकारी असतो. सरकारच्या निर्णयांवर लक्ष ठेवणे, धोरणांवर प्रश्न उपस्थित करणे, जनतेच्या हिताशी निगडित मुद्दे प्रभावीपणे सभागृहात मांडणे आणि विविध समित्यांमध्ये संतुलन राखणे यासाठी या पदाचे अस्तित्व असते. या पार्श्वभूमीवर यंदाच्या हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्ष नेत्याची नियुक्ती केली जाते का, याकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे.