तभा वृत्तसेवा
श्रीक्षेत्र माहूर,
dattamurthy-mahur-vitthal-temple : श्री समर्थ बाळानंद महाराज दुसखेडकर यांच्या प्रासादिक दत्तमूर्तीचा जन्मोत्सव विठ्ठल मंदिरात शेकडो भाविक व शिष्य मंडळीच्या उपस्थितीत भक्तीभावात साजरा करण्यात आला.
समर्थ श्री बाळानंदांच्या प्रासादिक दत्त मूर्तीची महती सांगताना त्यांचे वंशज बाळासाहेब पाठक महाराज म्हणाले, समर्थ बाळानंदांनी 1768 ते 1773 असे पाच वर्ष माहूर येथे दत्तशिखर मंदिराच्या पायथ्याशी कंदमुळे, पाने, फुले खाऊन तपश्चर्या केल. तेव्हा त्यांना सगुण रूपातील एकाने दर्शन देऊन स्वतःचे रूप छोट्या दत्तमूर्तीच्या स्वरूपात प्रसाद म्हणून देऊन ती ‘दत्तमूर्ती ’ दरवर्षी दत्तजयंतीला माहूरला दर्शनासाठी घेऊन येण्याची आज्ञा केल्याचे सांगितले.
तेव्हापासून म्हणजे 1774 पासून बाळानंद महाराज दुसखेडा (पाचोरा, जि. जळगाव) ते माहूर पायी दिंडी घेऊन येत. सतत 65 वर्षे त्यांनी पायी दिंडी घेऊन माहूर येथे दत्त जन्मोत्सव साजरा करण्याची परंपरा सुरु ठेवली. बाळानंद महाराज यांचा जन्म 1740 मध्ये झाला, तर त्यांचे निर्वाण 1839 साली झाले. ते तब्बल 99 वर्षे जगले. त्यांच्या निर्वाणानंतर त्यांच्या वंशजांनी ती परंपरा आजपर्यंत सुरू ठेवली.
दुसखेडा ते माहूरपर्यंत पायी दिंडी येत असून त्यांचे अनेक शिष्य पायी दिंडीत सहभागी होत असतात. आज त्यांचे वंशज पाठक महाराज यांनी दिंडीची परंपरा कायम ठेवली. काही वर्षांपासून पायी दिंडी बंद होऊन त्यांचे शिष्य वाहनांनी जन्मोत्सवासाठी उपस्थिती दर्शवितात. या दत्त जन्मोत्सवास आज 251 वर्षाची परंपरा लाभली आहे.
दुसखेडा येथील पाटील घराण्याचे वंशज शिष्य होते, आजही श्रीराम पाटील मागील 65 वर्षांपासून महाराजांच्या दिंडीत सहभागी असतात. बाळानंदाचे शिष्य वाहनचालक बाळू त्रिंबक भोई हे 20 वर्षांपासून अविरत वाहनचालक म्हणून सेवेत असतात. समर्थ बाळानंद महाराजांची समाधी दुसखेड येथे असून तेथील दत्त संस्थानात ही प्रासादिक मूर्ती दर्शनार्थ असते.