तभा वृत्तसेवा
राळेगाव,
cow-trafficking : गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रीय महामार्गावरील करंजी हे गोवंश तस्करीचे हॉटस्पॉट असून तेथून जनावरांच्या वाहनांना पासिंग करण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. पुन्हा एकदा सिनेस्टाईल पाठलाग करीत करंजीजवळ पोलिसांनी सापळा रचून अवैध गोवंश तस्करी रोखली आहे. या कारवाईत 35 जनावरांनी सुटका करून दोन ट्रकसह 47 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाई पोलिस ठाणे वडकी व सहायक पोलिस अधीक्षक तथा उपविभागीय पोलिस अधिकारी पांढरकवडा यांच्या आदेशाने वडकी पोलिसांनी शुक्रवारी रात्रीदरम्यान केली. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वरून नागपूरवरून हैदराबादकडे जनावरांची तस्करी करणाèया दोन ट्रकला उपविभागीय पोलिस अधिकाèयांच्या पथकाने सिनेस्टाईल पाठलाग करून पकडले. यातील 35 जनावरांची सुटका केली, तर पोलिसांनी दोन ट्रकसह 47 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
नागपूरहून हैदराबादकडे जात जनावरांची अवैध वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी पथकाला मिळाली. माहिती मिळताच अधिकाèयांचे एक पथक महामार्गावर रवाना झाले. दोन्ही ट्रक अतिशय वेगात पोलिसांच्या समोरून निघून गेले. पोलिसांनी त्यांचा पाठलाग करीत त्यांना पकडले. या कारवाईत एमएच40 बीजी8744 तर दुसरा ट्रक क्र. एमएच40 सिटी1318 ताब्यात घेतला. पोलिसांनी या जनावरांना ताब्यात घेऊन पंचनामा करून गोरक्षण संस्थेच्या ताब्यात दिले.
पोलिसांनी करंजीजवळ ट्रक पकडल्यानंतर दोन्ही ट्रकचे चालक ट्रक सोडून पळून जात होते. त्यांनाही पाठलाग करून पकडले. यात तसलीम फैयाज अहमद (वय 32, नागपूर), दुसरा चालक ऐफाज हबीब खान (वय 28, कामठी) यांचा समावेश आहे. दोन्ही चालकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
कारने वाहने पास करण्याचा प्रयत्न
या प्रकरणात आरोपी यांना जनावरांची वाहने पास करण्याकरीता कारद्वारे वाहनाच्या समोर राहून मदत करणारे आरोपी आकाश कुडमथे (पाटणबोरी), आकीब अली अकबर अली(पांढरकवडा) व ट्रक मालकाविरुद्ध गुन्हा नोंदवला.