नागपूर,
nitin-gadkari : व्यक्तिगत जीवनामध्ये शारीरिक स्वास्थ्य उत्तम असणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. कृषिविकास प्रतिष्ठानच्या वतीने माणिकलाल गांधी स्मृती विदर्भ गौरव पुरस्कार योगाभ्यासी मंडळाचे अध्यक्ष रामभाऊ खांडवे यांना आज प्रदान करण्यात आला. रोख एक लाख, शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. त्यांनी तो योगाभ्यासी मंडळाला अर्पण केल्याचे जाहीर केलेे. प्रसिद्ध समीक्षक-विचारवंत डॉ. वि.स. जोग, डॉ. गिरीश गांधी, प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. अरुण वानखेडे, निलेश वानखेडे, अॅड. निशांत गांधी, किशोर कन्हेरे व्यासपीठावर उपस्थित होते.
नितीन गडकरी म्हणाले की, व्यक्तिगत जीवनामध्ये शारीारिक स्वास्थ्य उत्तम असणे गरजेचे आहे. मला हे उशिरा कळले. माझे संपूर्ण आयुष्य हे बेशिस्त होते. कोविडने आयुष्य बदलले. आजही मी अडीच तास व्यायाम करतो. कामही काटेकोर करतो. खाण्याच्या बाबतीतही मी प्रसिद्ध होतो. नियत कमी झाली नसली तरी आता खाणे बरेच कमी झाले आहे. खाण्यावर नियंत्रण ठेवले आहे. त्यामुुळे 46 किलो वजन कमी झाले आहे.
आपले शरीर चांगले ठेवा, असे मी सांगत असतो. स्वास्थ चांगले असेल तर सगळ्या गोष्टींचा उपभोग घेता येतो. सगळ्या गोष्टींचा आनंद घेण्यासाठी शरीर उत्तम पाहिजे. शरीर उत्तम ठेवायचे असेल तर रोज योगासने, व्यायाम केला पाहिजे, हे नितीन गडकरी यांनी अधोरेखित केलेे.
डॉ. वि.स. जोग म्हणाले की, योगसाधनेत कुठल्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला वाव नाही. भाबडेपणाला वाव नाही. हा एक अतिशय महत्त्वाचा वैज्ञानिक असा व्यायामाचा प्रकार आहे. त्यामुळे सगळ्या प्रकारच्या अंधश्रद्धा दूर ठेवून आपण योगसाधना मनापासून स्वीकारली, त्याप्रमाणे रोज करायला हवी. त्याचा आपल्याला लाभ होतो.
प्राणायामासाठी ध्यानाची आवशक्ता आहे. ध्यान, प्राणायामाची सूपरलेटिव्ह डिग्री म्हणजे कुंडलिनी शक्ती जागृत करणे कसलीही अंधश्रद्धा नाही. असे मानले जाते की, ज्ञानेश्वरांना ही अतिंद्रीय शक्ती प्राप्त झाली होती. ज्ञानेश्वरी व भगवद््गीतेमध्येही योगाचे महत्त्व सांगितलेले आहे, याकडे डॉ. वि.स. जोग यांनी लक्ष वेधले.
समाजामध्ये शरीर, मन, बुद्धीचे आरोग्य व्हावे, यासाठी जनार्दनस्वामींना योग प्रसाराचे काम सुरू केले. या गुरू कार्याचा हा सन्मान आहे, असे मनोगत रामभाऊ खांडवे यांनीही व्यक्त केले. शुभदा फडणवीस, निलेश खांडेकर, बाळ कुळकर्णी, रमेश बोरकुटे व इतरांना कार्यक्रसाठी परिश्रम घेतले.