नागपूर,
nitin-gadkari : केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यक्रमाला रविवारी उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सामाजिक, शैक्षणिक, रोजगार, पायाभूत सुविधा व शासकीय योजनांशी संबंधित विविध प्रश्नांसाठी नागरिकांनी थेट मंत्र्यांशी संवाद साधत आपल्या मागण्यांची मांडणी केली.
अनेक तरुणांनी त्यांच्या स्टार्टअप कल्पना, तांत्रिक नवकल्पना व सामाजिक उपक्रमांबाबत इनोव्हेटिव्ह प्रस्ताव सादर केले. काहींनी रस्त्यांची दुरुस्ती, नवीन रस्त्यांची मागणी तसेच वाहतूक सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजनांवर संवाद साधला.
दिव्यांग नागरिकांचीही यावेळी मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. त्यांनी कृत्रिम अवयवांची तसेच सहाय्यक साधनांची मागणी केली. ई-रिक्षा, तीनचाकी आदींसाठी दिव्यांगांनी निवेदन दिले. काहींनी कृत्रिम अवयव व इतर सहकार्य प्राप्त झाल्याबद्दल गडकरींचे आभार मानले. यावेळी अनुकंपा तत्त्वावरील श्रावणबाळ योजना तसेच इतर शासकीय सामाजिक सुरक्षा योजनांमधील आर्थिक मदत मंजूर करून द्यावी, अशा स्वरूपाची निवेदनेही अनेकांनी दिली. वृद्ध, महिला, वंचित घटकांच्या शासकीय लाभांबाबत आलेल्या तक्रारी व सूचना मंत्र्यांनी लक्षपूर्वक ऐकून घेतल्या.
गडकरी यांनी उपस्थित नागरिकांच्या सर्व मागण्यांची नोंद घेऊन संबंधित विभागांना तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी महापालिका, नागपूर सुधार प्रन्यास, जिल्हाधिकारी कार्यालय, आरोग्य विभाग, पीडब्ल्यूडी, भूमि अभिलेख, जिल्हा परिषद, समाज कल्याण विभाग, सीआरसी सेंटर, नगर भूमापन अधिकारी, सेतू कार्यालय, पोलिस, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग, मुख्यमंत्री सहायता कक्ष, महावितरण, दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते.