मालेगाव,
pangrabandi-burglary : तालुक्यातील पांगराबंदी येथे दिवसा घडलेल्या घरफोडीचा गुन्हा मालेगाव पोलिसांनी अवघ्या काही तासांत उघडकीस आणत एका आरोपीला अटक केली. तसेच सोन्याची पोत व रोख रक्कम मिळून एकूण ७७,४७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश आले.
४ डिसेंबर रोजी दिवसा पांगराबंदी गावातील एका बंद घराचे कुलूप तोडून चोरी झाल्याची तक्रार मालेगाव स्टेशनमध्ये दाखल झाली. घरातून ४.५ ग्रॅम सोन्याची पोत (किंमत ५५ हजार रुपये) तसेच १० हजार रुपयांची रोख रक्कम असा एकूण ६५ हजार रुपयांचा माल चोरीस गेला होता. तक्रार मिळताच पोलीस निरीक्षक राजेश खेरडे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आली. गुन्ह्याचा कसून तपास करत अल्पावधीतच आरोपीचा ठावठिकाणा शोधण्यात पोलिसांना यश आले.
याप्रकरणी पृथ्वीराज उर्फ काल्या संतोष वाघमारे (वय २०) रा. गोटखेड, ता. बार्शीटाकळी, जि. अकोला या युवकाला अटक करण्यात आली. तपासादरम्यान आरोपीकडून गुन्ह्यात चोरीस गेलेली सोन्याची पोत तसेच रोख रक्कम हस्तगत करण्यात आली. शिवाय गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल देखील जप्त करण्यात आली. या कारवाईत दिलीप रहाटे, हेकॉ प्रदीप लांडगे, सुनिल पवार, किशोर चिंचोलकर तसेच पोकॉ विजय मोरे व मिलिंद राजगुरे यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली.