आर्वी,
rahul-godbole : नगरपरिषद निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश महासचिव अनंत मोहोड यांनी ‘काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केलेला नाही,’ असे म्हणत काढलेले निवेदन म्हणजे, पक्षाची ढासळलेली विश्वासार्हता आणि आर्वीतील राजकीय वास्तव लपवण्याचा एक केविलवाणा प्रयत्न आहे, असे सांगत भाजपा शहर अध्यक्ष राहुल गोडबोले यांनी आ. सुमित वानखेडे यांच्या संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत मोहोड यांच्या निराधार निवेदनाचे खंडण केले.
राहुल गोडबोले पुढे म्हणाले, अनंत मोहोड यांनी दिलेले स्पष्टीकरण म्हणजे, भाजपामध्ये प्रवेश केलेल्या कार्यकत्यांच्या निष्ठेवर संशय घेऊन काँग्रेसने स्वतःचीच थट्टा करून घेणे आहे. काँग्रेसचे इच्छुक उमेदवार प्रणिती जैसिंगपुरे, परतेकी, निखिल डोरले, सुधाकर वाघमारे, चेतन लवटे, प्रमिला सुरजुसे, राखी विरोले, विजय पुरोहित यांनी आमदार सुमित वानखेडे यांच्या नेतृत्वाखालील जाहीर सभेत मोठ्या जनसमुदायासमोर भारतीय जनता पार्टीत सन्मानाने प्रवेश केला आहे. हे सर्व कार्यकर्ते आता सक्रियपणे भाजपासाठी काम करत आहेत, असेही गोडबोले यांनी यावेळी जाहीर केले.
काँग्रेसमध्ये प्रभावी नेतृत्व नसल्यामुळे निराश झालेल्या या नेत्यांनी स्वतः भाजपामध्ये काम करत असल्याची पुष्टी केली आहे. काँग्रेसने त्यांच्या प्रवेशाबद्दल कोणतेही व्हिडिओ किंवा दावे प्रसिद्ध केले असले, तरी ते केवळ पक्षातील खोलवर पसरलेल्या गोंधळाचे आणि त्यांना परत पक्षात ओढण्याच्या हताश प्रयत्नांचे द्योतक आहे. आर्वीतील जनता सत्य काय आहे, हे चांगलेच जाणते. काँग्रेसच्या एबी फॉर्म चोरीच्या महानाट्याचे मूळ काँग्रेसच्या अंतर्गत स्वार्थी राजकारणात आहे. एबी फॉर्म चोरी करण्याचा प्रकार करण्यात आला. या षडयंत्रामुळेच निष्ठावान इच्छुक उमेदवारांना फॉर्म मिळू शकले नाही आणि त्यांनी काँग्रेसच्या नेतृत्वावरचा विश्वास गमावून भाजपामध्ये प्रवेश केला. काँग्रेसमध्ये प्रभावी नेतृत्वाचा अभाव आहे. स्थानिक नेतृत्वाकडून कार्यकर्त्यांचे राजकीय भविष्य संपवले जात आहे. या गटबाजीमुळे आणि राजकीय विश्वासघातामुळे आर्वीतील काँग्रेस पक्ष व नेत्यांच्या राजकीय अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे, असेही ते म्हणाले.
भाजपा आर्वीच्या विकासासाठी कटिबद्ध असून, आम्ही प्रवेश केलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे पक्षात स्वागत करता. आमदार सुमित वानखेडे व भाजपा नेते सुधीर दिवे यांच्या नेतृत्वाखाली परिवर्तन घडवून आणू, असा विश्वासही त्यांनी व्यत केला.
पत्रकार परिषदेला आर्वी विधानसभा प्रमुख विजय बाजपेयी, माजी नगराध्यक्ष प्रशांत सव्वालाखे, वर्धा भाजपा उपाध्यक्ष प्रशांत ठाकूर, मंगेश चांदुरकर, माजी नगरसेवक प्रकाश गुल्हाने, गौरव जाजू आदी उपस्थित होते.