मॉस्को,
putin-india-visit रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन भारताच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावरून परतत असतानाच मॉस्कोसाठी एक मोठी भू-राजकीय घडामोड समोर आली आहे. अफ्रिकेतील सुदानने लाल समुद्राच्या किनाऱ्यावर रशियाला कायमस्वरूपी लष्करी–नौदल तळ उभारण्याची औपचारिक ऑफर दिली आहे. या हालचालीमुळे हिंद महासागर क्षेत्रातील सामरिक समीकरणे बदलण्याची शक्यता असून अमेरिकेसह पाश्चात्य देशांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
लाल समुद्रावर रशियाची नजर
वॉल स्ट्रीट जर्नलच्या अहवालानुसार, सुदान सरकारने रशियाला आपल्या भूभागावर ३०० पर्यंत रशियन सैनिक आणि चार युद्धनौका — त्यात अणुऊर्जेवर चालणाऱ्या नौकांचाही समावेश — तैनात करण्याची परवानगी देण्याची तयारी दर्शवली आहे. putin-india-visit बदल्यात सुदानला अत्याधुनिक शस्त्रास्त्रे, हवाई संरक्षण प्रणाली आणि लष्करी उपकरणांची मागणी मान्य करण्याची अपेक्षा आहे. लाल समुद्राची भौगोलिक रचना अत्यंत महत्त्वाची मानली जाते. बाब-एल-मंडेब सामुद्रधुनी आणि सुएझ कालवा यांना जोडणारा हा समुद्री पट्टा जागतिक व्यापाराच्या मोठ्या वाट्यासाठी अत्यावश्यक आहे. त्यामुळे या भागात नौदल तळ उभारण्याची संधी रशियासाठी मोठे धोरणात्मक यश ठरू शकते. सीरियातील बशर अल-असद शासन कमकुवत होत गेल्यानंतर भूमध्य समुद्रातील प्राप्त प्रभाव गमावलेल्या रशियाला हाच मार्ग नव्या सामरिक शक्यतांचा दरवाजा उघडू शकतो.
अंतर्गत संघर्षाने कमकुवत झालेला सुदान
२०२३ पासून सुरू असलेल्या गृहयुद्धामुळे सुदानचे लष्करी ढांचे आणि व्यवस्थापन पूर्णपणे ढासळले आहे. लाखो नागरिक विस्थापित झाले असून देशाला पश्चिमेकडून हवी ती लष्करी मदत मिळत नाही. अशा परिस्थितीत रशिया हा सर्वात विश्वासू भागीदार म्हणून सुदानसमोर उभा राहिला आहे. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये हा करार पुढे सरकण्याची शक्यता अधिक आहे.
अमेरिका आणि चीनसमोर नवे आव्हान
हिंद महासागर क्षेत्रात आधीच चीनचा जिबूतीमध्ये महत्त्वाचा नौदल तळ आहे, तर अमेरिकेची उपस्थिती देखील तेथे मजबूत आहे. अशात रशियाचा नवीन प्रवेश या सागरी पट्यातील शक्ती-संतुलन पूर्णपणे बदलू शकतो. त्यामुळे वॉशिंग्टन आणि त्याचे मित्रदेश या घडामोडीकडे अत्यंत सावधपणे लक्ष ठेवून आहेत. या ताज्या घडामोडीमुळे पुतिन यांच्या भारत दौऱ्यानंतर रशियाच्या जागतिक धोरणाला नवी गती मिळाल्याचे स्पष्ट दिसत आहे.