बाळू मुंगले
वडनेर,
rural unemployment राज्यातील ग्रामीण भागात वाढलेले बेरोजगारीचे प्रमाण तरुणांच्या वैवाहिक आयुष्यावर परिणाम करू लागले आहे. नोकरी नाही, म्हणून लग्न नाही, अशी परिस्थिती मोठ्या प्रमाणावर पहावयास मिळत असून अनेक तरुणांनी पस्तीशी गाठल्यानंतरही विवाहाचा विषय काही केल्या मार्गी लागत नाही. परिणामी, ग्रामीण समाज रचनेत हा नव्या प्रकाराचा सामाजिक प्रश्न डोके वर काढत आहे.
ग्रामीण भागात वाढत्या बेरोजगारीमुळे बहुतेक तरुण शेती हा एकमेव आधार मानून जीवन जगत आहेत. परंतु, मुलांना लग्नासाठी मुलगी शोधताना मुलीच्या घरच्यांची पहिली अट म्हणजे स्थिर नोकरी असल्याने शेती करणार्या मुलांना थेट नकारघंटेचा सामना करावा लागत आहे. पदवीधर असूनही चांगली नोकरी मिळत नाही. कंत्राटी नोकर्या, कमी वेतन आणि अस्थिर कामाची परिस्थिती. यामुळे तरुणांचे भविष्य अनिश्चित बनले आहे. चांगला पगार किंवा सरकारी नोकरी नसल्यास विवाहासाठीचे प्रस्ताव लगेच धुडकावून लावले जातात.
लग्नाचे वय ओलांडल्याने rural unemploymen तरुणांमध्ये मानसिक तणाव, आत्मविश्वास कमी होणे, समाजातील टीका आणि पालकांची वाढती चिंता या समस्या तीव्र होत आहेत. सध्या मुलीसाठी मुलगा स्थिर नोकरी, लखपती कुटुंब, शेती आणि भरगच्च पगार अशी अपेक्षा वाढलेली दिसते. अशा परिस्थितीत केवळ पारंपरिक शेतीवर अवलंबून असलेल्या मध्यम व अल्पभूधारक कुटुंबातील तरुणांना सुयोग्य वधू मिळणे कठीण झाले आहे. सधन कुटुंबातील मुलांचे लग्न तुलनेने सोपे जाते. मात्र, सामान्य वर्गातील तरुणांना लग्नासाठी वधू घरापर्यंतचा मार्ग अधिक कठीण बनला आहे.ग्रामीण भागात सक्षम, मेहनती आणि कर्तुत्ववान असतात. तरीही फत ‘नोकरी नाही’ या एका कारणावरून त्यांना नाकारले जाते. हा विचार आता बदलण्याची गरज आहे. स्वभाव, कामाची तयारी, जबाबदारीची जाणीव आणि कर्तुत्व यांनाही महत्त्व दिल्यास अनेकांची घरे सुखाने नांदू शकतील. बेरोजगारीची बेडी तुटल्याशिवाय लग्नाची जोडी जुळणे कठीण आहे. त्यासाठी समाजाचा दृष्टिकोन बदलणे, प्रशासनाने रोजगार निर्मितीवर भर देणे आणि तरुणांनाही कौशल्य विकासाकडे लक्ष देणे या तिन्हींचा संयुत प्रयत्नाची आज अत्यंत आवश्यकता आहे.