दक्षिण चीन समुद्राचा वाद पुन्हा भडकला! फिलिपाइन्सच्या निर्णायक पावलाने चीन संतापला

    दिनांक :07-Dec-2025
Total Views |
मनिला,  
south-china-sea-dispute दक्षिण चीन समुद्रातील तणाव पुन्हा एकदा उफाळून आला आहे. चीनच्या सैन्याने वादग्रस्त समुद्री हद्दीत गस्त घालत असलेल्या फिलिपाइन्सच्या विमानाच्या दिशेने तीन चमकदार फ्लेअर्स डागल्याची घटना समोर आली आहे. हे फ्लेअर्स चीनच्या सुबी रीफ बेटावरून सोडण्यात आले, मात्र ते फिलिपाइन्सच्या ग्रँड कॅरावॅन विमानापासून नेमके किती अंतरावर होते, हे स्पष्ट झालेले नाही. आकाशात उठलेले हे तेजोदीप कोणत्याही मोठ्या धोक्यात रूपांतरित झाले नाहीत, तरी त्यांनी या समुद्री प्रदेशातील वाढती तणाव  स्पष्ट दाखवला, ज्या भागावर चीन, फिलिपाइन्स यांच्यासह अनेक देश सार्वभौमत्वाचा दावा करतात.
 
south-china-sea-dispute
 
शनिवारी घडलेल्या या घटनेची माहिती फिलिपाइन्स कोस्ट गार्डने दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार, नियमित हवाई गस्तीदरम्यान त्यांच्या विमानावर सुबी रीफकडून तीन फ्लेअर्स सोडण्यात आले, तरीही विमानाने आपले कामकाज अखंडितपणे सुरू ठेवले. चीनकडून मात्र या घटनेवर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. south-china-sea-dispute दक्षिण चीन समुद्राच्या जवळपास संपूर्ण भागावर दावा करीत असलेला चीन वारंवार आपल्या सार्वभौमत्वाचे संरक्षण करण्याचा इशारा देत असतो. यापूर्वीही चीनने आपल्या ताब्यातील बेटांवरून आणि सैनिकी विमानांतून फ्लेअर्स सोडून इतर देशांच्या विमानांना मागे हटण्याची चेतावणी दिली आहे. ताज्या घटनेविषयी फिलिपाइन्स कोस्ट गार्डने सांगितले की, त्यांच्या देखरेखीच्या उड्डाणादरम्यान या फ्लेअर्सचे व्हिडिओ फुटेजही रेकॉर्ड करण्यात आले. त्यांच्या या हवाई गस्तीचा उद्देश समुद्री पर्यावरणावर लक्ष ठेवणे, मत्स्य संपत्तीची स्थिती जाणून घेणे आणि पश्चिम फिलिपाइन्स समुद्रातील फिलिपिनो मच्छीमारांची सुरक्षा सुनिश्चित करणे हा आहे.
गस्ती दरम्यान त्यांनी सुबी रीफजवळ दोन चीनी तटरक्षक जहाजे आणि 29 संशयित मिलिशिया जहाजे आढळली. या प्रदेशातील विवाद केवळ चीन आणि फिलिपाइन्सपुरते मर्यादित नाहीत. व्हिएतनाम, मलेशिया, ब्रुनेई आणि तैवान हे देशही अनेक दशकांपासून या समुद्री भागावर हक्क सांगत असल्याने दक्षिण चीन समुद्रातील तणाव सतत वाढतच आहे.