वर्धा,
wardha-theft : स्थानिक स्टेशन फैल परिसरातील रहिवासी अश्विनी पंकज इंगळे यांच्या घरातून अज्ञात चोरट्यांनी भरदिवसा तब्बल ३८ हजारांचा मुद्देमाल चोरून नेला. ही घटना ६ रोजी घडली असून या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अश्विनी इंगळे या स्टेशन फैल भागातील शिवाजी शाळेजवळ राहतात. त्या सावंगी मेघे येथील रुग्णालयात काम करतात. तर त्यांचे पती रोजमजुरीचे काम करतात. ६ रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास अश्विनी या सासू रेखा यांना सोबत घेऊन किराणा घेण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी अश्विनीचा मुलगा मयंक घरी होता. पण तो दार उघडे टाकून खेळण्यासाठी घराबाहेर पडला. याच दरम्यान संधी साधून चोरट्याने इंगळे यांच्या घरात प्रवेश करून घरातील सोन्याचे कानातले, सोन्याची नथ, चांदीच्या तोरड्या, चांदीचे जोडवे, असा ३८ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. अश्विनी घरी परतल्यावर त्यांना घरातील साहित्य अस्तव्यस्त दिसले. पाहणी केल्यावर घरात चोरी झाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी घटनेची माहिती शहर पोलिसांना देत तक्रार नोंदविली. पोलिसांनी गुन्हा दाखल करीत प्रकरण तपासावर घेतले आहे.