अभिषेकच्या चौकार-षटकारांची पाकिस्तानमध्ये क्रेझ; गुगलवर नंबर वन

    दिनांक :08-Dec-2025
Total Views |
नवी दिल्ली
Abhishek's craze in Pakistan भारतीय सलामीवीर अभिषेक शर्माने २०२५ च्या आशिया कपमध्ये पाकिस्तानी गोलंदाजांवर केलेल्या जबरदस्त फटकेबाजीचा प्रभाव आजही पाकिस्तानात कायम आहे. त्याने दाखवलेल्या आक्रमक खेळाचे पडसाद इतके तीव्र होते की पाकिस्तानी प्रेक्षक हे क्षण विसरूच शकले नाहीत. त्यामुळेच अभिषेक शर्मा हा २०२५ मध्ये पाकिस्तानमध्ये सर्वाधिक गुगलवर शोधला गेलेला क्रिकेटपटू ठरला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे पाकिस्तानचे दिग्गज खेळाडू बाबर आझम, शाहीन शाह आफ्रिदी आणि हरिस रौफ हे गुगलवरील टॉप १० सर्चमध्येही स्थान मिळवू शकले नाहीत.
 
 
abhishek sharma
युएईमध्ये खेळल्या गेलेल्या आशिया कपमध्ये अभिषेकने स्पर्धेला अक्षरशः वैयक्तिक शोमध्ये रूपांतरित केले. त्याने सर्वाधिक ३१४ धावा करत सरासरी ४४.८५ आणि तब्बल जवळपास २०० चा स्ट्राईक रेट नोंदवला. गोलंदाजाने चेंडू टाकताच तो अचूक टायमिंगसह सीमारेषेबाहेर पाठवण्याची त्याची क्षमता पाकिस्तानला सर्वाधिक जखमी करणारी ठरली. पहिल्या सामन्यात १३ चेंडूत ३१ धावा आणि दुसऱ्या सामन्यात ३९ चेंडूत ७४ धावा ठोकत त्याने पाकिस्तानी गोलंदाजीची पुरती वाट लावली. जरी अंतिम सामन्यात पाकिस्तानने त्याला स्वस्तात बाद केले, तरी तोपर्यंत त्याने संपूर्ण स्पर्धेचे चित्रच बदलून टाकले होते.
 
 
अभिषेकच्या या स्फोटक खेळाने पाकिस्तानात मोठी चर्चा रंगली. तेथील माध्यमांनीही त्याच्या फटकेबाजीचे भरभरून कौतुक केले. त्याच्या खेळाविषयीची उत्सुकता इतकी वाढली की पाकिस्तानी चाहत्यांनी गुगलवर सर्वाधिक शोधलेले नाव ठरले. २०२५ च्या गुगल सर्च यादीत तो पहिल्या क्रमांकावर, आणि टॉप-५ मध्ये स्थान मिळवणारा एकमेव बिगर-पाकिस्तानी खेळाडू ठरला. दरम्यान, भारतात गुगल शोधांमध्ये वैभव सूर्यवंशी पहिल्या क्रमांकावर होता. त्याच्या पाठोपाठ प्रियांश आर्य, अभिषेक शर्मा, शेख रशीद आणि जेमिमा रॉड्रिग्ज अशी नावे होती. भारतीय क्रिकेटपटूंच्या या यादीत अभिषेकने तिसरे स्थान पटकावत देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली लोकप्रियता अधोरेखित केली.