बेळगाव हिवाळी अधिवेशनात मराठी आंदोलकांना अटक

    दिनांक :08-Dec-2025
Total Views |
बेळगाव,
Belgaum Winter Session कर्नाटक विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाला आज (८ डिसेंबर) बेळगावात सुरुवात होत असताना सीमाभागात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. मराठी भाषिकांच्या दीर्घकाळापासूनच्या मागण्यांची दखल घेण्याची मागणी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी जोरदारपणे व्यक्त केली जात असताना, कर्नाटक सरकारकडून मुस्कटदाबीची भूमिका घेण्यात आली आहे. खानापूर येथील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या अनेक नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
 
 

Belgaum Winter Session 
दरवर्षी हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मराठी भाषिकांचा महामेळावा आयोजित केला जातो, जो मराठी ओळख, हक्क आणि न्यायासाठीचा संघर्ष जिवंत ठेवणारा मंच मानला जातो. यंदाही मोठ्या संख्येने मराठी बांधव सहभागी होणार होते, मात्र संभाव्य विरोध आणि मोठ्या प्रमाणातील उपस्थितीची धास्ती घेत कर्नाटक सरकारने महामेळाव्याला परवानगी नाकारली. त्यानंतर मराठी एकीकरण समितीच्या नेत्यांना अटक करून आंदोलने रोखण्याचा प्रयत्न केला गेला. कर्नाटक सरकारच्या या निर्णयावर स्थानिक मराठी जनतेबरोबरच महाराष्ट्रातही तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने रस्त्यावर उतरून निषेध व्यक्त केला. कोल्हापूर येथील एसटी स्टँडवर कर्नाटक परिवहनाच्या बसेस अडवून आंदोलन करण्यात आले. मराठी जनतेच्या आंदोलनावर मुस्कटदाबी सहन केली जाणार नाही, असा इशारा देण्यात आला.
 
 
दरम्यान, सुवर्णसौधभोवती २० दिवसांसाठी जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. दिल्लीतील लालकिल्ल्याजवळ झालेल्या स्फोटामुळे पोलिसांनी विशेष सुरक्षा ठेवली आहे. २०१२ ते २०२४ दरम्यान हिवाळी अधिवेशनात २७ गुन्हे दाखल झाले, ७३ पोलिस अधिकारी व कर्मचारी आणि २१ लोक जखमी झाले, तर ६ लाख २३ हजार रुपयांचे नुकसान झाले. या कारणास्तव अधिवेशनाच्या दहा दिवसांत पोलिसांच्या परवानगीशिवाय कोणतीही आंदोलन करू शकणार नाही. पाचपेक्षा जास्त लोकांच्या गटांना जमण्याची परवानगी नाही, कोणतीही शस्त्रे, प्राणघातक साधने किंवा काठ्या घेऊन जाण्यास परवानगी नाही, तसेच पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्ग रोखून निषेध करण्यास मनाई करण्यात आली आहे. या सर्व कारणास्तव सुवर्णसौधभोवती कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.