गडचिरोली,
Geeta Hinge's accidental demise आधार विश्व फाऊंडेशनच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेश उपाध्यक्ष गीता हिंगे यांचे काल उशिरा झालेल्या भीषण अपघातात निधन झाले. नागपूरहून गडचिरोलीकडे पती सुशील हिंगे यांच्यासह परतत असताना पाचगावजवळ हा अपघात घडला. त्यांच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरमधील काम आटोपून रात्री सुमारे पावणे बारा वाजता त्यांनी महिंद्रा एसयूव्हीतून गडचिरोलीकडे परतीचा प्रवास सुरू केला होता. पाचगावजवळ विरुद्ध दिशेने येणारे एक वाहन अचानक नियंत्रण सुटून डिव्हायडर ओलांडत त्यांच्या वाहनाला समोरून धडकले. हा जोरदार धक्का नेमका गीता ताई बसलेल्या बाजूला झाल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि त्यांनी जागीच प्राण गमावले.
गीता हिंगे यांनी अनेक वर्षे भारतीय जनता पक्षात विविध पदांवर कार्य करताना उत्साही, कर्तव्यदक्ष आणि लोकसंग्रही नेत्या म्हणून भक्कम ओळख निर्माण केली होती. आधार विश्व फाऊंडेशनच्या माध्यमातून त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबविले. यंदाच्या निवडणुकांमध्ये भाजपाकडून तिकीट नाकारल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. नुकतेच पक्षाने त्यांच्यावर विश्वास दाखवत त्यांची महिला प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती केली होती. त्यांच्या निधनामुळे राजकीय, सामाजिक आणि महिला क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या पश्चात पती सुशील हिंगे, दोन मुले आणि मोठा आप्तपरिवार आहे.