वर्धा,
Pankaj Bhoyar, शेतकर्यांना शेतीसोबतच पुरक व्यवसाय मिळावा तसेच त्यांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध व्हावी, यासाठी पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या पुढाकारामुळे आमदार दत्तक ग्राम सालोड (हिरापूर) येथे गोट मार्केटची निर्मिती करण्यात येणार आहे. त्यासाठी ३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकर्यांच्या उत्पादनावर मोठा गंभीर परिणाम झाला आहे. शासनाकडून शेतकर्यांचे जीपमान उंचविण्यासाठी विविध योजना कार्यान्वित करण्यात आल्या आहे. शेतीसोबतच शेतकर्यांनी दुग्ध उत्पादन व शेळी पालन करण्यासाठी शासनाने अनुदानावर योजना आरंभ केल्या आहे. ग्रामीण भागात शेळी पालन व्यवसाय करणार्यांची संख्या मागील काही वर्षात वाढली आहे. परंतु, शेळी पालन करणार्यांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध होत नव्हती. त्यामुळे त्यांचे आर्थिक नुकसान होत होते. या पृष्ठभूमीवर पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी पुढाकार घेत त्यांनी दत्तक घेतलेल्या सालोड गावामध्ये गोट मार्केट उभारण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू केले. जिल्हा नियोजन समिती मार्फत नावीण्यपुर्ण योजनेतंर्गत सालोड (हिरापूर) येथे गोट मार्केटची निर्मिती करण्यात येणार आहे. मार्केट उभारणीसाठी ३ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.
वाढीव आराखड्यासाठी घेतली पंकजा मुडे यांची भेट
सालोड (हिरापूर) येथील गोट मार्केटसाठी ३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मात्र, सदर मार्केट विदर्भातील एक नामांकीत मार्केट म्हणून उदयास यावे यासाठी पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या सूचनेनुसार वाढीव आराखडा तयार करण्यात येवून राज्य शासनास सादर करण्यात आला आहे. सोमवारी पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांची भेट घेऊन गोट मार्केटच्या वाढीव आराखड्याला मंजूरी देण्याची विनंती केली.