इंडिगोची उड्डाणे पुन्हा सुरू...प्रवाशांसाठी ६१० कोटींचा रिफंड प्रक्रिया पूर्ण

    दिनांक :08-Dec-2025
Total Views |
नवी दिल्ली,
IndiGo flights resume देशभरात उड्डाणे रद्द झाल्यामुळे निर्माण झालेल्या गोंधळानंतर इंडिगोने अखेर मोठा दिलासा दिल्याचा दावा केला आहे. कंपनीने सांगितले की, त्यांच्या ९५ टक्के सेवा पुन्हा पूर्ववत सुरू झाल्या असून प्रवाशांचे नुकसान भरून काढण्यासाठी आतापर्यंत ६१० कोटी रुपयांची रिफंड प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांत दिल्ली, मुंबई, चेन्नई, बंगळूरू, अहमदाबाद आणि कोलकात्यासह देशातील प्रमुख विमानतळांवर परिस्थिती ढासळली होती. इंडिगोच्या सततच्या उड्डाण रद्दीकरणामुळे विमानतळांची अवस्था बसस्थानकांसारखी दिसत होती.
 
IndiGo flights resume
 
कंपनीतील कर्मचाऱ्यांनी केलेल्या विविध मागण्यांमुळे सेवा ठप्प झाल्याचे समोर आले. या प्रकरणानंतर नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने इंडिगोला कारणे दाखवा नोटीस पाठवली, तर सरकारने वाढत्या विमानभाड्यांवर लगाम ठेवण्यासाठी एडवायजरी जारी केली. ३ डिसेंबरपासून सुरू झालेल्या या संकटात २,००० हून अधिक उड्डाणे रद्द झाली, लाखो प्रवाशांचे प्रवास नियोजन बिघडले आणि असंख्य प्रवासी मोठ्या अडचणीत सापडले. मात्र शनिवारी रात्रीपासून परिस्थिती हळूहळू सुधारत असल्याचे संकेत मिळू लागले. नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या माहितीनुसार, इंडिगोने केवळ रिफंडच नव्हे तर प्रवाशांचे ३,००० हून अधिक सामान पोहोचवण्याचे कामही पूर्ण केल्याचा दावा केला आहे.
 
 
दरम्यान, या गोंधळात भारतीय रेल्वे अनेक प्रवाशांसाठी तारणहार ठरली. पश्चिम रेल्वेने अहमदाबाद विमानतळावर विशेष तिकीट काउंटर सुरू करून अडकलेल्या प्रवाशांना तत्काळ रेल्वे तिकिटांची सुविधा उपलब्ध करून दिली. इंडिगोच्या या व्यत्ययानंतर चिपी–सिंधुदुर्ग विमानतळालाही अनपेक्षित लाभ झाला. इतर कंपन्यांकडे वळलेल्या प्रवाशांमुळे चिपीहून चालणाऱ्या 'फ्लाय ९१'च्या पुणे, बंगळूरू आणि हैदराबाद मार्गावरील सेवा फुल क्षमतेने धावू लागल्या. विमानतळावर रोज ४२० पेक्षा अधिक प्रवासी येत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. वाढत्या मागणीमुळे अतिरिक्त विमानसेवा सुरू करण्याचा विचारही कंपनी करत आहे.