पुणे,
maharashtra punha kadakyaachi thandi महाराष्ट्रात थंडीने पुन्हा एकदा जोरदार पुनरागमन केले असून अनेक जिल्ह्यांत तापमानाचा पारा झपाट्याने घसरत आहे. धुळ्यात तब्बल ५.४ अंश सेल्सिअस इतके किमान तापमान नोंदवले जाऊन हंगामातील सर्वात थंड सकाळ अनुभवली गेली. विदर्भातही थंडीचा कडाका वाढत असून नागपूर, गोंदिया, भंडारा, अमरावती येथे पारा १० अंशांच्या खाली गेला आहे. गेल्या काही दिवसांपासून थंडीने घेतलेला ‘ब्रेक' आता संपला असून राज्यातील किमान तापमानात पुन्हा एकदा मोठी घट होत आहे. उत्तरेकडून येणारे थंड वारे वेगाने मध्य महाराष्ट्राकडे सरकत असल्याने वातावरण अधिक गारठले आहे. हवामान विभागाने पूर्व विदर्भासाठी यलो अलर्ट जारी करत पुढील काही दिवस थंडीची लाट कायम राहण्याचा इशारा दिला आहे.

मुंबईतही थंडी जाणवत असून पारा १७ अंश सेल्सिअसपर्यंत खाली जाण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुण्यासह कोकण, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात रात्रीचे तापमान घटल्याने लोकांना मोठ्या प्रमाणावर गारठा जाणवतो आहे. दिवसभरामध्ये कमाल तापमान किंचित वाढत असले तरी रात्रीचा पारा खाली येत असल्यामुळे थंडीचे प्रमाण अधिक वाढले आहे. जळगाव जिल्ह्यात ८ ते १२ डिसेंबरदरम्यान किमान तापमान ८ ते ११ अंश राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ‘हेझ’ स्थिती, धुके आणि कोरडे वारे यामुळे सकाळी दृश्यमानता कमी आहे. स्थानिक हवामान अभ्यासकांनी सोमवारी पारा आणखी खाली जाण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील थंडीने मात्र सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. येथे तापमानाचा पारा १० अंशांवर घसरला असून हे तापमान महाबळेश्वरपेक्षा थंड असल्याचे हवामान विभागाने सांगितले. यंदा फेब्रुवारीपर्यंत थंडीच्या दोन ते तीन लाटा जाणवू शकतात, असा अंदाजही तज्ञांनी वर्तवला आहे. हवामान खात्याने देशभरात ११ डिसेंबरपर्यंत थंडीची लाट कायम राहण्याचा इशारा दिला असून नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. राज्यभर सकाळ-संध्याकाळीस मोठ्या प्रमाणात गारठा जाणवू लागल्याने हिवाळ्याची तीव्रता वाढत चालली आहे.